TOD Marathi

मुंबई | एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर ठाकरे गटाकडून बंडखोर गटाला ‘गद्दार’ म्हणून हिणवलं जात आहे. शिंदे गटाच्या बंडखोरीला एक वर्ष पूर्ण झालं आहे. या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडूनही शिंदे गटावर टीका केली जात आहे. २० जून हा ‘जागतिक गद्दार दिन’ म्हणून साजरा करावा, असं आवाहन राष्ट्रवादीने कार्यकर्त्यांना केलं होतं. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टीकास्र सोडलं आहे.

फडणवीस म्हणाले, शरद पवारांनी १९७८ साली जे केलं ते मुत्सद्देगिरी आणि तेच एकनाथ शिंदे यांनी केलं तर गद्दारी, असं कसं चालेल? असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी विचारला. ते केंद्रातील मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर येथे आयोजित जाहीर सभेत बोलत होते.

हेही वाचा”…महाराष्ट्रात पाऊस धुमाकूळ घालणार; या जिल्ह्यांना ऑरेंज अ‍ॅलर्ट, तर…”

शरद पवारांवर टीका करताना फडणवीस  म्हणाले, “१९७८ मध्ये शरद पवार हे वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातील ४० आमदार घेऊन बाहेर पडले होते. त्यांनी तेव्हाच्या भाजपबरोबर सरकार स्थापन केलं. ते सरकार दोन वर्षे चाललं. पंतप्रधान इंदिरा गांधींनी ते सरकार बरखास्त केलं नसतं तर ते सरकार पाच वर्षे चाललं असतं. म्हणजे तेव्हा पवारसाहेबांनी जे केलं ते मुत्सद्देगिरी आणि तेच एकनाथ शिंदे यांनी केलं तर गद्दारी? असं कसं चालेल.”

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंनाही लक्ष्य केलं. “काल मी पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीला परिवारवादी म्हटलं, तर उद्धव ठाकरे यांना मिरची झोंबली. पण उद्धवजी, ‘तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करू?’ मी काचेच्या घरात राहत नाही. तुम्ही राहता. त्यामुळे माझ्या नादी लागू नका. ज्यांच्या आलमरीत सांगाडे पडले आहेत, त्यांनी सावकरीचा आव आणायचा नसतो. ते सांगाडे बाहेर निघाल्याशिवाय राहणार नाहीत. मी कधी कुणाच्या भानगडीत पडत नाही आणि पडलो तर त्यांना सोडत नाही,” अशी जोरदार टीका फडणवीसांनी केली.