TOD Marathi

चंद्रपूर | राष्ट्रवादी काँग्रेसला ओबीसी चेहरे हे केवळ दाखविण्याकरिता हवे असतात. मात्र, पदं देताना तो विचार होत नाही ही वस्तुस्थिती आहे. भाजपचा ‘डीएनए’ ओबीसी आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे यांनी रविवारी भाजपात प्रवेश केला. त्यावेळी फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री शोभा फडणवीस, आमदार बंटी भांगडिया, संजीव बोदकुरवार, संदीप धुर्वे, माजी राज्यमंत्री परिणय फुके, आशिष देशमुख यांच्यासह भाजपचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा” …“पवारसाहेब तुम्ही केली ती मुत्सद्देगिरी आणि शिंदेंनी केली ती…”, फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल!”

फडणवीस म्हणाले, की बहुजन समाजाला मुख्य धारेत आणण्याचे काम भाजप करीत आहे. भाजप हा ओबीसींसाठी झटणारा पक्ष आहे. चहा विकणारा या देशाचा पंतप्रधान होतो, हा ओबीसी समाजाचा सन्मान आहे. नुकतेच पंतप्रधान मोदी यांचे अमेरिकेतील झालेले स्वागत हे विस्मयचकित करणारे होते. त्यामुळे देशाचा सन्मान वाढला आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात सर्वाधिक ओबीसी समाजबांधवांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे, ही बाब आजवरच्या इतिहासात प्रथमच दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, डॉ. जीवतोडे यांनी मागणी केलेल्या समृद्धी महामार्गाची व्याप्ती ही गोंदिया, गडचिरोलीनंतर आता चंद्रपुरातूनही वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली.

ओबीसी मंत्रालय झाल्यापासून आजवर कधी नव्हे १६ ओबीसींच्या हिताचे ‘जीआर’ पारित करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी हा केवळ पश्चिम महाराष्ट्राकडे लक्ष देतो. पण, भाजप हा पक्ष विदर्भ विकासासोबत संपूर्ण राज्याचा विचार करतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विदर्भ विकासाच्या ध्यासामुळे आपण भाजपात प्रवेश करीत असल्याचे डॉ. जीवतोडे म्हणाले.