TOD Marathi

पुणे | महाराष्ट्रात पक्षविस्तारासाठी पावले टाकत असलेले भारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा सोलापूर दौरा सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. या दौऱ्याच्यानिमित्ताने KCR यांच्याकडून मोठे शक्तीप्रदर्शन केले जात आहे. चंद्रशेखर राव हे मंगळवारी सकाळी पंढरपूर येथे जाऊन विठुरायाचे दर्शन घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केसीआर यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. केसीआर हे मटण खाऊन पंढरपूरच्या वारीला जात असल्याचा आरोप मिटकरी यांनी केला आहे. अमोल मिटकरी यांचे हे ट्विट सध्या व्हायरल होत आहे.

या ट्विटमध्ये अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे की, मटनाचा शाही बेत! पंढरी वारीवर असताना मुख्यमंत्री केसीआर हा प्रकार शोभतो का ? वारकऱ्यांच्या भावनाशी खेळू नका ? पंढरपूरला येताना १० हजार वेळा विचार करा.पंढरीची वारी पवित्र आहे आपल्या अश्या वागण्याने अपवित्र करू नका, असे मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. यावर आता भारत राष्ट्र समितीमध्ये नव्याने दाखल झालेले महाराष्ट्रातील नेते काही प्रतिक्रिया देतात का, हे पाहावे लागेल.

हेही वाचा” …भाजप ओबीसींसाठी झटणारा पक्ष; आमच्या डीएनमध्ये OBC, फडणवीसांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल”

केसीआर यांच्या दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली आहे. ते काहीवेळापूर्वीच धाराशिवच्या उमरगा येथे दाखल झाले. तेथून केसीआर, तेलंगणाचे सर्व मंत्री, आमदार, खासदार असा ताफा सोलापूर येथे दाखल होईल. सोलापूरात दाखल होताना केसीआर यांच्यासोबत तब्बल ६०० गाड्यांचा ताफा असेल, अशी माहिती आहे. केसीआर आज सोलापूर येथे मुक्काम करणार असून उद्या सकाळी विठुरायाचे दर्शन घेतील. भारत राष्ट्र समितीच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सोलापुरात मुक्कामासाठी शहरातील विविध हॉटेल्समध्ये २२० रूम बुक करण्यात आल्याची माहिती आहे.