TOD Marathi

 सोलापूर | आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये येणाऱ्या लाखो भक्तांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा सुरु असतानाही वारकऱ्यांना विठ्ठलाचे मुखदर्शन घेता येणार आहे. अनेक वर्षांच्या परंपरेला छेद देत विठ्ठलभक्तांसाठी घेतलेल्या या निर्णयाच सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

आतापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा सुरु होण्याच्या चार तास आधीच दर्शनाची रांग बंद करण्यात येत होती. त्यामुळे आलेल्या लाखो वारकऱ्यांची मोठी गैरसोय होत होती. रांगेतील कालावधी चार तासांनी वाढल्यामुळे अनेकांचा खोळंबा व्हायचा आणि रांग वाढत जायची. परंतु ही गैरसोय टाळण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा”… कागलमध्ये हाय व्होल्टेज लढत, महाडिकांचं सूचक वक्तव्य; म्हणाले…”

आषाढी एकादशीला मुख्यमंत्री पहाटे अडीच वाजताच्या सुमारास महापूजेला येतात. जवळपास पहाटे पाच वाजेपर्यंत ही शासकीय पूजा आणि सत्कार कार्यक्रम मंदिरात पार पडतो. आता मुख्यमंत्री सपत्नीक शासकीय महापूजा करत असतानाही विठुरायाचे मुखदर्शन सुरुच ठेवले जाणार आहे. अशी सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रात्री बैठकीत याबाबतची माहिती दिली आहे.

या निर्णयामुळे जवळपास दीड-दोन लाख भाविकांना विठुरायाचे मुखदर्शन घेता येणार आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी विठुरायाचं दर्शन घेता यावं, यासाठी भाविक अनेक तास दर्शनाच्या रांगेत उभे असतात. त्याचवेळी व्हीआयपी मंडळी दर्शन घेण्यासाठी गर्दी करत असतात. हे टाळण्यासाठी शिंदे सरकारने धाडसी निर्णय घेत आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांची पूजा सुरु असतानाही सामान्य भाविकांना मुखदर्शन सुरु ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व स्तरातून सरकारचं कौतुक केलं जात आहे.