टिओडी मराठी, पुणे, दि. 30 जुलै 2021 – ‘त्या’ ऑडिओ क्लिपची चौकशी झाली पाहिजे. चौकशी होणे गरजेचं आहे. त्यानंतर जे सत्य आहे, ते समोर येईल. गृहमंत्री यांनी याबाबत जे काही सांगितलंय, त्यावरून सर्व काही स्पष्ट होतील. हे माझ्या विरुद्धचं षडयंत्र आहे, असे म्हणत पुण्याच्या पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.सध्या पुणे पोलीस दलाबाबत चर्चेचा विषय ठरला आहे तो म्हणजे पुणे पोलीस, बिर्याणी अन् ती क्लिप याचा.
सध्या पुणे पोलीस दलामध्ये ‘त्या’ ऑडिओ क्लिपमुळे खळबळ माजलीय. यात पुणे पोलीस दलातील एक महिला अधिकारी कर्मचाऱ्याला जेवणाची ऑर्डर देताना हॉटेलवाल्याला बिलाचे पैसे देण्याची काय गरज आहे? अशी विचारणा करतात.
तर, या संभाषणातील महिला अधिकरी म्हणजे पुण्याच्या पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे आहेत, असे बोलले जात आहे. यावर स्वतः पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपली बाजू मांडलीय.
पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे म्हणाल्या, माझ्या झोनमध्ये काही कर्मचारी होते, जे बऱ्याच वर्षांपासून ठाण मांडून बसले होते. त्यामुळे त्यांचे काही आर्थिक हितसंबंध जोडले होते. हप्तेगिरी तिथे चालत होती. माझ्या अगोदर जे अधिकारी काम करत होते, तेही यात सहभागी आहेत.
बदल्यांच्या काळात ही मॉर्फ क्लिप बाहेर का आणली गेली?, ही क्लिप माझी नाही. माझ्या विविध संभाषणांमधील वाक्य यात जोडलेले आहेत. तसेच, यातील काही भाग जो आहे तो मी बोललेली नाही. हि संपूर्णत: मॉर्फ क्लिप आहे, याची चौकशी झाली पाहिजे . मी या विरोधात सायबर क्राईममध्ये गुन्हा दाखल करणार आहे.
महेश साळुंके म्हणून जे कर्मचारी माझ्या कार्यालयामध्ये होते. त्यांच्यासोबत जे दुसरे कर्मचारी होते. ज्यांना१२ वर्षे झालीत. त्यांच्याबाबत मी डिफॉल्ट रिपोर्ट पाठवला होता. कारण, ते हप्तेखोरी करत होते. हे सगळं मी येण्या अगोदर व्यवस्थित सुरू होतं.
मी आल्यानंतर ते सगळं काही बंद झालं. त्यामुळे या सर्वांचे हीतसंबंध अतिशय दुखावले गेलेत. म्हणून माझी इथून उचलबांगडी व्हावी, त्यांचं जे अगोदर सुरू होतं, ते सुरू रहावं, यासाठी केलेला हा कट आहे.
यात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा त्यांना पाठींबा आहे. त्यांच्या आदेशाने आणि निदर्शनात हे सुरूय. माझ्या करिअरला नुकसान व्हावं, म्हणून हे केलं आहे.
ही ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. पुणे पोलीस दलात एकच चर्चा रंगली आहे. यादरम्यान राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या ऑडिओ क्लिपची दखल घेतलीय. दिलीप वळसे पाटील यांनी याप्रकरणी आयुक्तांकडून अहवाल मागवलाय.