TOD Marathi

टिओडी मराठी, टोकियो, दि. 30 जुलै 2021 – भारताची स्टार महिला शटलर पी. व्ही. सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीमध्ये प्रवेश नोंदवत पदक निश्चित केलं आहे. सुवर्णपदक जिंकण्यापासून सिंधू केवळ दोन पाऊल दूर आहे. टोकियो ऑलिम्पिक ही स्पर्धा मागील वर्षी होणार होती. पण, करोनाच्या उद्रेकामुळे ती एका वर्षासाठी पुढे ढकलली.

या करोनाच्या काळात क्रीडाविषयक उपक्रम बंद होते. अनेक खेळाडूंना व्यवस्थितरित्या प्रशिक्षण घेणे शक्य होत नव्हते. पण, सिंधूने या वेळेचा उपयोग ऑलिम्पिकच्या तयारीसाठी केला.

२०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या सिंधूने या करोना काळात आपल्या तंत्रावर आणि शैलीवर भर दिलाय. पी. व्ही. सिंधू म्हणाली, करोना काळातील वेळ माझ्यासाठी उपयोगी ठरला.

तांत्रिक बाबींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मी हा वेळ उपयोगात आणला. त्यामुळे मला त्याचा फायदा झाला आहे. कधी कधी आम्ही जेव्हा स्पर्धेला जातो. तेव्हा आम्हाला प्रशिक्षण घेण्यास कमी कालावधी मिळतो.

पण, यावेळी प्रशिक्षण घेता आले. त्यामुळे करोनाचा माझ्या तयारीवर परिणाम झाला नाही, याउलट मला शिकायला मिळाले.

सिंधूने आपला आक्रमक फॉम कायम राखत टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत धडक दिलीय. तिने उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकाने यामागुचीवर सहज सरशी साधलीय. सिंधूच्या नव्या शैली समोर यामागुची निष्प्रभ ठरलीय.

तिने यामागुचीचा २१-१२, २२-२० असे सरळ सेटमध्ये नमवले. उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये सिंधूसमोर ताई जू यिंग किंवा रत्नाचोक इंतानोन यापैकी एकजण आमने-सामने असेल.