बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने तिची मॅनेजर अंजुला आचार्यचा वाढदिवस लॉस एंजेलिसमध्ये अगदी देसी स्टाईलमध्ये साजरा केला. प्रियांकाने स्वतः आपल्या घरी ही पार्टी आयोजित करून तिच्या मॅनेजरला सरप्राईज केलं आहे. या पार्टीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये प्रियांका आपली मॅनेजर आणि पती निक जोनससोबत ढोलाच्या तालावर भांगडा करताना दिसत आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमीच आपल्या कर्मचाऱ्यांना खास वागणूक देत असते.
अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिच्या मॅनेजरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा एक फोटोही शेअर केला आहे. यासोबतच प्रियांका-निकच्या फॅन क्लब ‘Jerry x Mimi’ इन्स्टाग्राम अकाऊंटवर अंजुलाच्या बर्थडे बॅशचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडिया सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. प्रियांकाच्या सरप्राईजने आनंदी झालेल्या तिच्या मॅनेजरने एक भावनिक पोस्ट शेअर केली आणि या सगळ्याबद्दल तिचे आभार मानले आहेत.
वाढदिवसाच्या पार्टीत प्रियंका हिरव्या रंगाच्या जंपसूटमध्ये दिसत आहे. तर तिची मॅनेजर काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. ऑलिव्ह ग्रीन जॅकेट आणि राखाडी पँटमध्ये निक जोनस फारच हॅन्ड्सम दिसत आहे. एका व्हिडिओमध्ये प्रियांका तिच्या मॅनेजरला सरप्राईज देत स्वतः केक आणताना दिसत आहे.
या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला एक ढोल वाजताना ऐकू येत आहे. व्हिडिओमध्ये प्रियांका बर्थडे गर्ल आणि निकसोबत प्रचंड उत्साहात भांगडा करताना दिसत आहे.