टिओडी मराठी, मुंबई, दि. 20 मे 2021 – आता कोरोनाची चाचणी करणं सोप्प होणार आहे. आणि हि चाचणी घरबसल्या करता येणं शक्य होणार आहे. गर्भवती मीनल दाखवे भोसले हिने घरबसल्या कोरोना चाचणीचं किट बनवलं आहे. तसेच याला आयसीएमआरने कोविड-19 च्या चाचणीसाठी मंजुरी दिली आहे.
हे एक रॅपिड अँटिजेन टेस्टिंग किट असून याचा वापर कोरोनाची सौम्य लक्षणे असलेले किंवा बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेले लोक करु शकतात.
घरात केलेल्या चाचणीचा अहवाल अॅपच्या माध्यमातून आयसीएमआरपर्यंत पोहोचेल आणि तिथे तो गोपनीय ठेवण्यात येईल. भारतात सध्या केवळ एकाच कंपनीला यासाठी परवानगी दिली आहे. मायलॅब डिस्कव्हरी सॉल्युशन लिमिटेड असे या कंपनीचं नाव आहे.
पुण्यातील मायलॅबमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रमुख असणाऱ्या मीनल दाखवे-भोसले यांच्या नेतृत्त्वाखालील टीमने या किटचे डिझाईन तयार केलंय. हे किट तयार करताना त्या आठ महिन्यांच्या गर्भवती होत्या.
पुण्यातील एनआयव्ही या संस्थेत 18 मार्च 2020 रोजी किटची पहिली चाचणी घेतली. दुसऱ्याच दिवशी 19 मार्च रोजी मीनल यांनी मुलीला जन्म दिला. मग, पाच दिवसात म्हणजे 23 मार्च 2020 रोजी त्यांनी अन् त्यांच्या टीमने बनवलेल्या मायलॅब डिस्कव्हरी कंपनीच्या या किटला सरकारची मान्यता मिळाली.