मुंबई : शिवसेनेतून बंड केल्यानंतर शिंदे गटात गेलेले आमदार प्रताप सरनाईक यांना मोठा दिलासा मिळालाय. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने टॉप सिक्युरिटी घोटाळा प्रकरणात कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. ईडीदेखील याच अहवालाच्या आधारे क्लोजर रिपोर्ट सादर करणार असल्याची एकच जोरदार चर्चा आहे. तपासात प्रगती होत नसल्यानं क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे.
टॉप्स सिक्युरीटीज प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सी समरी रिपोर्टही सादर करण्यात आला आहे. आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचं पोलिसांनी म्हटले. याच रिपोर्टच्या आधारावर अटकेत असलेल्या आरोपींनी ईडीच्या कारवाईविरोधात कोर्टात अर्ज केला आहे. अमित चांदोले आणि टॉप्स सिक्युरीटीचे माजी संचालक शशिधरन यांनी कोठडीला विरोध करत आता दोषमुक्तीसाठी अर्ज केला आहे.
मुंबई सत्र न्यायालयाकडून ईडीला 21 सप्टेंबरपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आलेत. तोपर्यंत आरोपी चांदोले आणि शशिधरन यांना कोठडीतच ठेवण्याचे निर्देशही कोर्टाने दिले आहेत.
दरम्यान जामीन मिळावा म्हणून एम. शशिधरन आणि अमित चांदोले या दोघांनी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्या समोर सुनावणी पार पडली आहे.