मुंबई : एकनाथ शिदेंच्या बंडखोरीनंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरीतून निष्ठा यात्रेची सुरुवात केली आहे. रत्नागिरीत भाषण करताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर चांगलाच हल्लाबोल केला. महाराष्ट्र बाहेर जाणारे प्रकल्प रोखण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असंही ठाकरे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री गणपतीत 250 मंडळ फिरले, आता पुन्हा त्यांना दांडिया, गरबासाठी सगळीकडे फिरायचं असेल, असा टोमणा ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. राज्याच्या उद्योगमंत्र्यांना वेदांता-फॉक्सकॉनच्या प्रकल्पाबाबत काहीही माहिती नसणे हे धक्कादायक असल्याचे आदित्य यांनी म्हटले.
वेदांता-फॉक्सकॉनच्या मुद्यावर आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. आत्ताच्या उद्योगमंत्र्यांना या प्रकल्पाबाबत काहीच माहित नव्हते. या प्रकल्पासाठी मविआ सरकारकडून प्रयत्न सुरू होते, असेही आदित्य यांनी म्हटले. जूनमध्ये वेदांता-फॉक्सकॉन कंपनीने तळेगावची जागा पाहिली. राज्यात दीड लाख कोटींची गुंतवणूक येणार होती. त्याशिवाय, एक लाख रोजगार येणार होते. वेदांता-फॉक्सकॉन तळेगावात येणार होते. गद्दारांनी सरकार पाडल्यानंतरही एमआयडीसीने प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता.
मात्र, या सरकारने काहीच प्रयत्न केले नसल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. आदित्य ठाकरे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला. मी 32 वर्षाचा तरूण असून या प्रकल्पाबाबत माहिती देतो. मात्र, तुम्ही काहीच माहिती देऊ शकत नाही का, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.