TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 5 ऑगस्ट 2021 – भारतीय पुरुष हॉकी संघाने आज जपानच्या टोकियोमध्ये इतिहास रचला आहे. जर्मनीबरोबरच्या सामन्यात भारताने 41 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे. याबद्दल या संघाचे देशातून अभिनंदन आणि कौतुक होत आहेत. तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग आणि प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधानांच्या या फोनचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मागील 41 वर्षे भारतीय संघ ऑलिम्पिकच्या उपांत्य सामन्यात खेळला नव्हता. मात्र, टोकियोमध्ये भारताने उपांत्य फेरी गाठत कांस्यपदक मिळविले आहे. आज संपूर्ण देश भारतीय हॉकी संघाचे कौतुक करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगशी फोनवर संवाद साधला आहे. मनप्रीतसोबत बोलताना मोदी म्हणाले, तुम्ही कमाल केली आहे. आज संपूर्ण देश नाचत आहे.

संपूर्ण संघाने खूप मेहनत घेतली आहे. माझ्यावतीने संपूर्ण संघाचे अभिनंदन करा. याचबरोबर, पंतप्रधान मोदींनी संघाच्या दोन्ही प्रशिक्षकांशीही संवाद साधला. आणि 15 ऑगस्टनिमित्त सर्व खेळाडूंना आमंत्रितही केले.

तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरूनही संपूर्ण संघाचे अभिनंदन केले. ऐतिहासिक! असा दिवस जो प्रत्येक भारतीयाच्या स्मरणामध्ये राहील. पदक जिंकल्याबद्दल आमच्या पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन. भारताला आपल्या हॉकी संघाचा अभिमान आहे,असे ट्विट त्यांनी केले आहे.