TOD Marathi

बेकायदा देशी बनावटीचे Pistol बाळगल्याप्रकरणी Narhe येथे एकास Arrested ; 2 जिवंत काडतुसासह 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

टिओडी मराठी, पुणे, दि. 27 जून 2021 – बेकायदा देशी बनावटीचे पिस्तुल घेऊन फिरणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने पुण्यातील नऱ्हे येथे अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे असा 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अक्षय दिलीप रावडे (वय 26, रा. माळेवाडी, किरकटवाडी) असे अटक केलेल्याचे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, खंडणीविरोधी पथकातील पोलिस अधिकारी आणि कर्मचारी गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास नऱ्हे परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी एक तरुण पिस्तुलजवळ बाळगुन नऱ्हे परिसरातील पारी चौकाजवळ फिरत आहे, अशी माहिती पोलिस कर्मचारी राजेंद्र लांडगे आणि प्रफुल्ल चव्हाण यांना मिळाली.

त्यानुसार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने नऱ्हे येथील पारी चौकात सापळा रचला. त्यावेळी पुजा मार्केट दुकानासमोर एक तरुण संशयास्पदरीत्या फिरत आहे, असे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तुल व त्यातील मॅगझिनमध्ये दोन जिवंत काडतुसे आढळले. त्यामुळे पोलिसांनी त्यास अटक केली. आरोपी रावडे याच्याविरुद्ध यापुर्वीही बेकायदा शस्त्र बाळगणे यासह अन्य गुन्हे दाखल आहेत.