टिओडी मराठी, दि. 27 जून 2021 – उत्तम व्यवस्था व उत्तम निर्णय याबाबत जपान देशाची ख्याती जगात आहे. आता जपानी सरकारने देशातील कंपन्यांना कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ‘4 दिवस काम’ हा नियम लागू करावा, अशी सूचना केलीय.
विशेष म्हणजे, आठवड्यातले कोणते 4 दिवस काम करायचे? याचा निर्णय कर्मचाऱ्यांवर सोपविण्याची सूचना ही सरकारने केलीय. ‘फोर डे विक’ योजनेमुळे अनेक फायदे होतील, असे सरकारचे म्हणणे आहे.
सरकारच्या म्हणण्यानुसार नागरिकांना नोकरी, कुटुंब जबाबदाऱ्या, नवीन कौशल्ये आत्मसात करण्यासाठी वेळ हवाय. यासाठी वेळेचा ताळमेळ घालायला हवा म्हणून सरकारने गाईडलाईन तयार केल्यात. मात्र, यामुळे देशात नवीन वादाला तोंड फुटलं आहे.
सरकारच्या म्हणण्यानुसार ४ दिवस कामाचा आठवडा यामुळे लोक सुट्टीत बाहेर पडतील, खर्च करतील. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. तरुण वर्ग बाहेर पडला तर भेटीगाठी होतील. त्यातून लग्ने जुळतील व नवे बालके जन्माला येतील. परिणामी, देशाच्या घटत चाललेला जन्मदर सुधारू शकणार आहे.
जपानमध्ये सध्या कारोशी संख्या वाढते आहे. कारोशी म्हणजे जादा कामामुळे येणारा तणाव व त्यातून होणाऱ्या आत्महत्या, रिसर्च फर्म फुजीत्सूचे अर्थतज्ञ मार्टीन शुल्त्स सांगतात, सरकार फोर डे विकबाबत गंभीर आहे.
करोना काळात कंपन्यांनी काम करण्याच्या नव्या पद्धती आत्मसात केल्या आहेतच. त्यात काही त्रुटी आहेत. कर्मचाऱ्यांना कामाचे दिवस कमी झाले तर कमी पगार मिळेल अशी भीती आहे हे सरकारला विरोध करण्यामागचे मुख्य कारण आहे.