TOD Marathi

‘त्या’ अ‍ॅथलेटिक्स ट्रॅकवर मंत्र्याची वाहने, Union Sports Minister यांनी क्रीडा संकुलाला फटकारले !; म्हणाले, खेळाच्या नैतिकतेबद्दल होणारा अनादर पाहून वाईट वाटले

टिओडी मराठी, पुणे, दि. 28 जून 2021 – पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी अ‍ॅथलेटिक्स ट्रॅकवर मंत्र्यांची वाहने गेल्यावर सर्वच स्तरातून टीका होतेय. मंत्री आणि इतर मान्यवरांना लिफ्टने दोन मजले चढावे लागू नयेत, म्हणून त्यांची वाहने थेट अ‍ॅथलेटिक्सच्या कृत्रिम धावपट्टीवर आणली. याची गंभीर दखल केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी घेऊन यावरून क्रीडा संकुलाला फटकारले आहे.

केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, मला आपल्या देशात खेळ व खेळाच्या नैतिकतेबद्दल होणारा असा अनादर पाहून वाईट वाटले. आमदार सिद्धार्थ शितोळे यांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.

या ट्वीटची दखल केंद्रीय क्रीडामंत्री रिजाजू यांनी घेत नाराजी व्यक्त केलीय. सोशल मीडियावर क्रीडाप्रेमींकडून टीका केली जातेय.

सिंथेटिक ट्रॅक नक्की कशासाठी वापरायचा असतो?, खेळाडूंच्या सरावासाठी की नेत्यांच्या वाहनांचा ताफा मिरवण्यासाठी? असा प्रश्न हे पाहून पडतोय. जिथे आंतराराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा भरवल्या जातात, जिथं क्रीडापटू सराव करतात.

त्या सिंथेटिक ट्रॅकवर जाण्यास एरवी कोणाला परवानगी नसते. मात्र, पुण्यातील म्हाळुंगे – बालवाडीतील क्रीडा सुविधांची पाहणी करण्यासाठी आलेल्या नेत्यांची वाहनं या सिंथेटिक ट्रॅकवर नेली, अशी घटना घडली आहे.

राज्याचे क्रीडामंत्री म्हणाले :
महाराष्ट्र राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांनी शनिवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना संकुलामध्ये आमंत्रित केलं होतं. त्यावेळी घडलेल्या या प्रकारानंतर त्याबद्दल टीकेची झोड उठल्यावर राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी दिलगिरी व्यक्त केली.

शरद पवार यांच्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे वाहने ट्रॅकवर आणावी लागली, असे कारण क्रीडामंत्र्यानी दिलंय. त्यासह हा सिंथेटिक ट्रॅक वापरात नसल्याचा व लवकरच या ठिकाणी दुसरा सिंथेटिक ट्रॅक बनविण्यात येणार आहे, असा दावा देखील त्यांनी केलाय.