TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 26 ऑगस्ट 2021 – केंद्राने केलेल्या जाचक कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचे पुढील धोरण आणि दिशा ठरवण्यासाठी दिल्लीत 26 आणि 27 ऑगस्ट या दोन दिवशी शेतकऱ्यांचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित केले आहे. त्याला देशातील शेतकरी संघटनांचे सुमारे पंधराशे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

सिंघु बॉर्डरवर हे अधिवेशन होणार असून तेथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता नऊ महिने पूर्ण होत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. देशातील सर्वच शेतकऱ्यांना या आंदोलनात सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने हे अधिवेशन आयोजित केले आहे, असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

मागील नऊ महिने सुरू असलेल्या या देशातील सर्वात मोठ्या शेतकरी आंदोलनामध्ये देशाच्या चारही दिशांमधील राज्यांतले शेतकरी सहाभागी व्हावेत, असा आमचा प्रयत्न आहे, असेही आयोजकांकडून नमूद केले आहे.