टिओडी मराठी, मुंबई, दि. 14 ऑगस्ट 2021 – महाराष्ट्र राज्यातील रस्ते बांधणीच्या कामात शिवसैनिकांकडून अडथळे निर्माण केले जात आहेत. हे असेच सुरू राहिल्यास महाराष्ट्रातील कामे थांबवावी लागतील, असा इशारा देणारे पत्र केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवल्याने खळबळ उडालीय. यात आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उडी घेतलीय.
अकोला, नांदेड, वाशिम, उस्मानाबाद या जिल्ह्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामे सुरू असून चौपदरीकरणाचे काम करण्यात येत आहे. मात्र, यात शिवसैनिक अडथळे आणत आहेत. कंत्राटदारांना धमक्या देत आहेत, याकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये कोणी अडथडा आणत असेल तर काँग्रेस पक्ष नितीन गडकरी यांच्या पाठीशी आहे, असे म्हणत पटोले यांनी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे.
या दरम्यान नितीन गडकरी यांनी मुखमंत्री उद्धव ठाकरे यांना जे पत्र लिहिले आहे, ते दिल्लीच्या नेत्याच्या दबावात तर लिहिलं नाही ना?, हा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, 25 वर्ष हे दोन्ही पक्ष सोबत होते. तेव्हा यांना काही अडचण नव्हती, अशी शंका देखील नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे.