TOD Marathi

टिओडी मराठी, गाझापट्टी, दि. 16 मे 2021 – इस्त्रायलने शनिवारी गाझा शहरात केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये प्रसारमाध्यमांची कार्यालयांना टार्गेट करून ती इमारत उद्धवस्त झाली आहे. तो हल्ला म्हणजे प्रसारमाध्यमांना शांत करण्याचा प्रयत्न मानला जातोय. त्यामुळे इस्त्रायली लष्कराची कारवाई वादग्रस्त ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. जमीनदोस्त झालेल्या इमारतीत दि असोसिएटेड प्रेस (एपी), अल्‌-जझिरा आणि इतर प्रसारमाध्यमांची कार्यालये होती. हवाई हल्ल्यात इमारत कोसळत असल्याचे चित्रण करून माध्यमांनी त्याचं थेट प्रसारणही केलं. इस्त्रायलने त्या इमारतीला लक्ष्य का केले? ते समजू शकले नाही.

इस्त्रायली लष्कर आणि हमास या दहशतवादी गटातील संघर्ष उफाळून आलाय. त्यातून दोन्ही बाजूंकडून हल्ले-प्रतिहल्ले सुरू झालेत. अशात इस्त्रायलने माध्यमांची कार्यालये व निवासी अपार्टमेंट असणाऱ्या इमारतीला लक्ष्य केलं आहे. त्या हल्ल्यात संबंधित 12 मजली इमारत जमीनदोस्त झालीय. हल्ल्याअगोदर इस्त्रायली लष्कराने ती इमारत खाली करण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे रहिवासी व प्रसारमाध्यमांचे कर्मचारी इमारतीतून बाहेर पडले. त्यानंतर हल्ला झाल्याने जीवितहानी टळली.

यादरम्यान, माध्यमांच्या इमारतीवर हल्ला होण्याची घटना धक्कादायक व अस्वस्थ करणारी असल्याची प्रतिक्रिया एपीकडून दिली आहे. संबंधित इमारतीमध्ये माध्यमांची कार्यालये आहेत, अशी माहिती इस्त्रालयला खूप अगोदरपासून होती. आमच्या इमारतीवर हल्ला होणार आहे, असा इशारा आम्हाला मिळाला होता. पत्रकार वेळीच बाहेर पडल्याने ते बचावले.

आज जे काही घडले आहे, त्यामुळे गाझातील घडामोडींची कमी माहिती जगाला मिळतेय. इस्त्रायल सरकारकडून अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे, त्याशिवाय, अमेरिकी परराष्ट्र खात्याच्या देखील संपर्कात आहोत, असे एपीने म्हटले आहे.