TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 23 मे 2021 – मागील दीड महिन्यापासून महाराष्ट्र राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तसेच कालांतराने राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आले. त्यामुळे अनेकांचे हाल होत आहेत. म्हणून महाराष्ट्रात 31 मे नंतर लॉकडाऊन संपणार का?, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, 1 जून नंतर निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल केले जातील. यामुळे थोडासा दिलासा मिळणार आहे.

एप्रिल महिन्यात दररोज 70 हजारांहून अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येत होते. आता हाच आकडा 30 हजारांच्या खाली आलाय. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण काहीसा कमी झालाय.

तसेच मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक या शहरांमधील करोना रुग्णांची संख्या काही दिवसांत घटलीय. त्यामुळे या शहरांना मोठा दिलासा मिळालाय. मात्र, ग्रामीण भागांत करोना आणखी सक्रिय आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढत आहे. यावर बोलताना आरोग्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण संकेत दिलेत.

‘१ जून नंतर निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल केले जाणार आहेत. कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असलेल्या जिल्ह्यांमधील निर्बंध मागे घेतले जातील,’ अशी माहिती टोपे यांनी दिली आहे.

‘सध्या राज्यात कठोर निर्बंध लागू असल्यामुळे दुकाने केवळ सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. याचा परिणाम अनेक ठिकाणी दिसून आलाय. यामुळे कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. मुंबईसह एमएमआर रिजनमधील स्थिती नियंत्रणामध्ये आहे.

नाशिक, नागपूरमधील परिस्थिती चिंताजनक नाही. त्यामुळे या भागातील निर्बंध 1 जून नंतर शिथिल केले जातील. निर्बंध एकदम मागे घेण्याऐवजी टप्प्याटप्याने मागे घेतले जाणार आहेत. कोरोना रुग्णसंख्या कमी झालेल्या जिल्ह्यांसाठी या प्रकारचे निर्णय घेतले जातील,’ अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागांची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी कोकण दौरा केला. त्यावेळी त्यांना लॉकडाऊनबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावर, परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असे उत्तर दिले होते.

‘कोरोना कमी होतोय हे चांगले आहे. पण, त्यासंबंधी काही बोलणार नाही. गेल्या लाटेच्यावेळी आपण अनुभव घेतला आहे. गेल्या वेळीही आपण कोरोनावर नियंत्रण मिळवले होते. पण, थोडीशी शिथिलता आली अन् कोविड चौपटीने वाढला’, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते .