स्मार्टफोन कंपन्याना लॉकडाऊनचा फटका!; 15 ते 20 टक्क्यांची घसरण

टिओडी मराठी, मुंबई, दि. 10 मे 2021 – कोरोना दुसरी लाट व विविध राज्यांत लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील स्मार्टफोनच्या शिपमेंटमध्ये 2021 च्या दुसर्‍या तिमाहीमध्ये (एप्रिल ते जून या कालावधीत) 15 ते 20 टक्क्यांची घसरण दिसून येऊ शकते. सोमवारी एका नव्या अहवालात याबाबतचा दावा केला आहे.

मार्केट इंटेलिजेंस कंपनी सीएमआरच्या म्हणण्यानुसार, पुरवठा साखळीतील विघटन आणि घटकांच्या (कंपोनंट) अभावामुळे स्मार्टफोन ब्रँड्सवर परिणाम होणार आहे.

सीएमआरच्या वतीने आनंद प्रिया सिंह म्हणाले की, सध्याची बाजारपेठ चांगली असून स्मार्टफोन उद्योगाच्या संभाव्यतेबाबत आम्ही आशावादी आहोत. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च कालावधी), सॅमसंगने भारतातील संपूर्ण मोबाइल मार्केटमध्ये 18 टक्के बाजारासह आघाडी घेतलीय, तर शाओमी 28 टक्के मार्केट शेअरसह देशातील स्मार्टफोन विभागात वर्चस्व गाजवत आहे.

तर सीएमआरच्या इंडिया मोबाइल हँडसेट बाजाराच्या रिव्ह्यू अहवालानुसार, मार्चमध्ये संपलेल्या तिमाहीत भारतातील एकूण स्मार्टफोन शिपमेंटमध्ये 23 टक्क्यांनी वाढ झालीय. देशात 4 जी स्मार्टफोन्सना जोरदार मागणी असून 2021 च्या पहिल्या तिमाहीत 4 जी स्मार्टफोन शिपमेंटमध्ये 14 टक्के वाढ झालीय.

दुसऱ्या बाजूला शाओमीचा स्वतंत्र ब्रँड पोकोने 465 टक्क्यांनी वाढ नोंदविली आहे, तर वनप्लस आणि आयटेल स्मार्टफोनच्या शिपमेंटमध्येही तिहेरी आकड्यांची वाढ झालीय. म्हणजे वार्षिक आधारावर 100 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे.

Please follow and like us: