TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 15 ऑगस्ट 2021 – देशात 75 व्या स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. 75 व्या स्वातंत्र्यदिनी दिल्ली सचिवालयात आयोजित कार्यक्रमात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं. यावेळी केजरीवाल यांनी 1947पासून आजपर्यंत देशाचे स्वातंत्र्य अबाधित राखणाऱ्या आणि सीमेवर बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांनाही श्रद्धांजली वाहिली. २७ सप्टेंबरपासून शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीच्या सर्व सरकारी शाळेत देशभक्तीपर अभ्यासक्रम सुरु केला जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने, मुख्यमंत्र्यांनी मागील पाच वर्षात दिल्लीत शिक्षणावर केलेल्या कामांबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी अनेक नव्या घोषणाही केल्या.

तसेच केजरीवाल यांनी महान स्वातंत्र्य सेनानी शहीद भगतसिंग यांना श्रद्धांजली म्हणून २७ सप्टेंबरपासून दिल्लीच्या शाळेत देशभक्तीपर अभ्यासक्रम’ सुरू करण्याची घोषणा केली आहे.

प्रत्येक मुलामध्ये अभिमानाची भावना निर्माण करणे आणि त्यांना राष्ट्रासाठी सर्वस्व देण्यास तयार करणे, हा या मागील उद्देश आहे. आपला अभ्यासक्रम भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र शिकवतो. पण, देशभक्ती नाही. हा ‘देशभक्तीपर अभ्यासक्रम’ आपल्या मुलांत देशभक्तीची भावना निर्माण करेल,असे केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

स्वातंत्र्यदिनी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकणाऱ्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन करताना मुख्यमंत्र्यांनी आता ७० पदकांची तयारी करण्याची आवश्यकता आहे. २०४७ नंतर ऑलिम्पिक आयोजित करण्यासाठी तयारी करायची आहे, असे केजरीवाल यांनी म्हटले.

दिल्लीने संपूर्ण जगाला योगासने दिली. पण, आता ती नामशेष होत आहे. दरवर्षी २१ जून रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यांव्यतिरिक्त योगासाठी फारसे काही घडत नाही. आम्ही योगाचे वर्ग सुरु करणार आहोत.

तसेच योग शिक्षक आणि प्रशिक्षकांची एक मोठी टीम तयार करत आहोत. ३०-४० लोकांचा एक गट, ज्यांना योगा शिकायचा आहे, ते आमच्याशी संपर्क साधू शकतात. आम्ही योग प्रशिक्षक देऊ, असे केजरीवाल म्हणाले.