TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 15 ऑगस्ट 2021 – भारत देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसतर्फे व उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जोगेश्वरी पश्चिम येथील ओशिवरा मेगा मॉल ते वर्सोवा, चार बंगला अशी भव्य तिरंगा यात्रा काढली.

यावेळी तिरंगा गौरव यात्रेत नाना पटोले आणि भाई जगताप यांच्या समवेत मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष व माजी खासदार संजय निरुपम, ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या सचिव जेनेट डिसुझा, माजी आमदार अशोक जाधव, मुंबई काँग्रेसचे कोषाध्यक्ष भूषण पाटील, सहकोषाध्यक्ष अतुल बर्वे, सरचिटणीस संदेश कोंडविलकर, जिल्हाध्यक्ष क्लाइव्ह डायस, उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी नाना पटोले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आता देश तोडू पाहत आहेत, देशाचे संविधान बदलू पाहत आहेत. ज्या देशाला मागील 70 वर्षांत काँग्रेसने प्रगतीपथावर नेले. त्या देशाला तोडण्याचे पाप देशात कोरोनासारखे संकट आणणारे नरेंद्र मोदी करत असतील, तर ते आम्ही कदापी होऊ देणार नाही.

ज्या स्वातंत्र्यवीरांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करणे आणि त्यातून जनतेने प्रेरणा घेणे, हेच या तिरंगा यात्रेचे उद्दिष्ट आहे.

यावेळी भाई जगताप म्हणाले, ज्या स्वातंत्र्यवीरांनी आणि थोर महात्म्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांना अभिवादन करण्यासाठी आज काँग्रेसतर्फे तिरंगा गौरव यात्रेचे आयोजन केलं आहे.

मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष व माजी खासदार संजय निरुपम म्हणाले, आज आपल्या देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिना दिवशी ही तिरंगा गौरव यात्रा काढण्याचे कारण म्हणजे, इंग्रजांशी लढा देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात काँग्रेस पक्षाचे योगदान आहे.

मागील 70 वर्षे काँग्रेसने हे स्वातंत्र्य अबाधित ठेवले आहे. हे या मुंबई शहराला आणि देशातील जनतेला सांगण्यासाठीच काँग्रेसतर्फे ही तिरंगा गौरव यात्रा काढली आहे. या स्वातंत्र्याला गालबोट लावण्याचा कुणी प्रयत्न केला, तर ते वाचविण्यासाठी आम्ही काँग्रेस कार्यकर्ते उभे आहोत.