TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 22 ऑगस्ट 2021 – उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांचं शनिवारी निधन झालं. त्यांनी लखनौमधील एसजीपीजीआय रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला.

गेल्या दीड महिन्यांपासून ते आजारी होते. शनिवारी रात्री भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांची प्राणज्योत मालवली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी रुग्णालयामध्ये जाऊन कल्याण सिंह यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली होती.

भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारणा केली होती. त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही झाली होती. परंतु त्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा खालावल्याने अखेर त्यांचं निधन झालं.