TOD Marathi

टिओडी मराठी, कोलकाता, दि. 21 मे 2021 – पुन्हा राज्यात सत्तेवर आल्यानंतर विधान परिषद पुन्हा स्थापन करणार, हे दिलेलं आश्वासन पाळत ममता बॅनर्जी यांच्या ‘तृणमूल काँग्रेस’पक्षाने विधान परिषद पुन्हा स्थापन करण्याच्या निर्णयाला या आठवड्यात मंजुरी दिली आहे.

पश्चिम बंगाल राज्यात सलग तिसऱ्यांदा ममता बॅनर्जी सत्तेत आल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालच्या तृणमूल काँग्रेसच्या सरकारने राज्यात विधान परिषद पुन्हा स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे.

पक्षाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात तसे आश्वासन दिलं होतं. पश्चिम बंगालमध्ये पूर्वी राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह म्हणजेच विधान परिषद अस्तित्वात होती. मात्र, 50 वर्षांपूर्वी तत्कालीन डाव्या पक्षांच्या आघाडी सरकारने विधान परिषद बरखास्त केली होती.

पश्चिम बंगाल राज्याला आता विधान परिषद पुन्हा हवी आहे; पण एखाद्या राज्यात विधान परिषदेची स्थापना करणे हे पूर्णतः त्या राज्याच्या हातात नसतं. त्यासाठी केंद्र सरकारनेही संसदेमध्ये त्यासाठीचं विधेयक मांडणं आवश्यक आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात पुन्हा एकदा वादाला तोंड फुटण्यासाठी हा मुद्दा कारणीभूत ठरू शकतो, असे दिसत आहे.

या राज्यात आहे विधान परिषद :
सध्या बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि कर्नाटक या सहा राज्यांत विधान परिषद अस्तित्वात आहे. चक्षू रॉय यांनी एका इंग्रजी पेपरच्या लिहिलेल्या लेखात याबद्दलची सविस्तर माहिती दिलीय.