TOD Marathi

शिवसेनेच्या टिकेला लक्ष्मण जगताप यांच्या भावाचं प्रत्युत्तर, आम्हाला पर्याय होता मात्र…

विधानपरिषदेच्या दहाव्या जागेची लढाई महाविकास आघाडी आणि भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. या दहाव्या जागेवरील उमेदवार निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपसाठी एक एक मत महत्त्वाचे आहे. भाजपकडून मतांच्या जुळवाजुळवीसाठी कोणतीही कसूर ठेवण्यात आलेली नाही. राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी असलेल्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) हे पुन्हा एकदा मुंबईत येत आहेत. यावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून भाजपवर टिका करण्यात आली होती. भाजपने मतांसाठी माणुसकी तुडवून कर्करोगाशी झुंज देत असलेल्या दोन्ही आमदारांना स्ट्रेचर आणि व्हिलचेअरवरून आणले, असे ‘सामना’त म्हटले होते. (MLC Election 2022)

या टीकेला आता लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘सामना’मधून काय आरोप करण्यात आले ते मला माहिती नाही. पण पक्षाने आम्हाला स्पष्ट सांगितले होते की, तब्येत ठीक नसेल तर येऊ नका, अशी माहिती शंकर जगताप यांनी दिली. दहाव्या जागेवरून निवडून येण्यासाठी भाजपच्या प्रसाद लाड यांच्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांची मतं निश्चितच निर्णायक ठरतील. लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी थोड्याच वेळापूर्वी मुंबईत दाखल झाले. लक्ष्मण जगताप यांनी नुकतेच मतदानही केले.