TOD Marathi

राष्ट्रवादीच्या मलिक (navab malik) आणि देशमुख (Anil Deshmukh) मंत्र्यांना मतदानाचा हक्क उच्च न्यायालयाने (high court) नाकारला आहे. यामुळे या नेत्यांनी आता  सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून यावर काही वेळात सुनावणी होण्याची शक्यता आहे. परंतू, इकडे अपक्ष आमदार रवी राणा यांनाही अटक करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप राणा यांनी केला आहे.

दोन दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (Nagpur Bench)आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. हे वॉरंट घेऊन 18 जूनला अमरावती पोलीस रवी राणा यांच्या मुंबईतील खार येथील घरी पोहोचले होते. मात्र, राणा यांच्या घरी कुणीच नसल्याने पोलिसांना तसेच माघारी परतावे लागले होते. यामुळे रवी राणा आज मतदान करण्यासाठी विधान भवनात येणार, आलेच तर पोलीस त्यांना तिथेच अटक करणार, मतदान करू देतील की नाही याबाबत साशंकता आहे. यामुळे राणा यांच्या वकिलांनी नागपूरच्या खंडपीठामध्ये धाव घेतली असून मतदान करू द्यावे, अशी विनंती केली आहे. राणा यांना अटक झाली किंवा ते विधान भवनात नाही आले तरी भाजपाचे एक मत फुकट जाणार आहे. भाजपाला एकेक मत महत्वाचे आहे. राज्यसभेला राणा यांनी भाजपाला मदत केली होती. यामुळे राणा यांचे विधान परिषदेला मतदान करणे भाजपासाठी गरजेचे आहे.

गेल्या फेब्रुवारी महिन्यात अमरावती महापालिकेने (Amravati Municipal Corporation) छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा हटवला होता. यामुळे संतप्त झालेल्या युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी अमरावती येथील राजापेठ येथे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाई फेकून त्यांचा निषेध केला होता. याप्रकरणी अमरावती पोलिसांनी आमदार राणांविरुद्ध कलम ३०७ आणि कलम ३५३ अंतर्गत गुन्हे दाखल केले होते.

राजापेठ येथील उड्डाणपुलावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्यानंतर महापालिका आयुक्तांवर शाईफेक करण्यात आली होती. याप्रकरणी आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती आणि मुंबई पोलिसांचे एक पथक मला अटक करण्यासाठी मुंबईतील खार येथील निवासस्थानी पोहोचले, पण आपण त्या ठिकाणी उपस्थित नसल्याने ते मला अटक करू शकले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दबावतंत्राचा हा एक भाग असून आपण यावर कायदेशीर पद्धतीने उत्तर देणार आहोत, असे रवी राणा यांनी स्पष्ट केले आहे.