टिओडी मराठी, काबूल, 29 ऑगस्ट 2021 – अफगाणिस्तान देशातील काबूलमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ आज एक रॉकेट हल्ला झाला. अमेरिकेच्या सैन्याच्या देखरेखीखाली विदेशी नेगरिकांना सुरक्षितपणे देशाबाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे, यावेळी हा रॉकेट हल्ला झाला, असे अफगाण पोलीस प्रमुख रशिद यांनी सांगितले आहे. रविवारी दुपारी हा रॉकेट हल्ला झाल्याने या हल्ल्यात एका बालकाचा मृत्यू झाला. आतापर्यत कोणत्याही गटांने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही, असे ते म्हणाले.
काबूल विमानतळाजवळील गजबजलेल्या रहिवासी भागात या रॉकेटचा हल्ला झाला. गुलाई बागातील 11 व्या शतकातील खाजेह बघरा या पुरातन ठिकाणाजवळ या स्फोटाचा आवाज ऐकू आला होता. या भागातील रहिवासी इसारतीला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला असावा, असा अंदाज व्यक्त वर्तविला जात आहे.
अमेरिकेच्या सैन्याच्या देखरेखीखाली सुरू असलेली माघारीची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात सुरू आहे. अजूनही विमानतळाच्या परिसरात हजारो नागरिक सुटकेच्या प्रतिक्षेत आहेत. काही दिवसांपूर्वी इस्लामिक स्टेटशी संबंधित दहशतवादी संघटनेने घडवून आणलेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटामध्ये किमान 20 जण ठार झालेत. त्यात अमेरिकेच्या 13 सैनिकांचाही समावेश होता.