TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 6 मे 2021 – कोरोना काळात इस्रायलने भारताला हजारो वैयक्तिक किंवा सामूहिक वापरासाठी असलेले ऑक्सिजन जनरेटर, श्वसनाला मदत करणारे रेस्पिरेटर, औषधं आणि वैद्यकीय सामुग्री पाठवण्यास सुरूवात केलीय. “भारत हा आमच्या सगळ्यात जवळच्या व महत्त्वाच्या मित्र देशांपैकी एक आहे. भारतातील संकटाच्या याप्रसंगी इस्रायल भारतासोबत आहे, असे या इस्रायल देशानं म्हटलंय.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं कहर केला आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे. अशा काळात अनेक देशांनी भारताला वैद्यकीय मदतीसाठी हात पुढे केलाय. तर दुसरीकडे भारताचा मित्र समजल्या जाणाऱ्या इस्रायलनेही भारतासाठी वैद्यकीय मदत पोहोचवण्यास सुरूवात केलीय.

या आठवडाभरामध्ये विविध विमानांच्या सहाय्याने ही मदत भारतात येणार आहे. त्यासाठी इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद, आरोग्य मंत्रालय, आर्थिक मंत्रालय यांच्यासोबत तेल-अवीवमधील भारतीय दूतावास आणि नवी दिल्लीतील इस्रायली दूतावासाचंही अधिक प्रमाणात सहकार्य मिळतंय.

आमच्या भारतीय बाधंवाचे प्राण वाचवणारी वैद्यकीय उपकरणे व अन्य प्रकारची मदत पाठवत आहे. भारत व इस्रायलमधील संबंध सामरिक भागीदारीच्या स्वरुपाचे आहे. त्यात राजकीय, सुरक्षा आणि आर्थिक विषयांचा समावेश आहे,” अशी प्रतिक्रिया इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गाबी अश्कनाझी यांनी दिलीय.

या संयुक्त मदत कार्यात इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाची आर्थिक संबंध शाखा, इस्रायल-भारत चेंबर ऑफ कॉमर्स, द इस्रायल-एशिया चेंबर ऑफ कॉमर्स, मॅन्युफॅक्चरर्स असोसेशियन ऑफ इस्रायल, द फेडरेशन ऑफ इंडो-इस्रायली चेंबर्स ऑफ कॉमर्स, द इस्रायल एक्सपोर्ट इन्स्टिट्यूट, द स्टार्ट अप नेशन सेंट्रल यांच्यासह भारतात काम करणाऱ्या कंपन्यांचा देखील समावेश आहे.

अमडॉक्स या कंपनीने १५० ऑक्सिजन जनरेटर भारताला देण्याची घोषणा केलीय. ज्युईश जॉइंट डिस्ट्रिब्युशन कमिटी ऑक्सिजन सिलेंडर देणार आहे. मुंबईचे केइएम हॉस्पिटल, पनवेलचे महात्मा गांधी हॉस्पिटल आणि अहमदाबादच्या सरदार पटेल हॉस्पिटलला वेंटिलेटर पुरविणार आहे.

कोरोना संकटाच्या सुरुवातीला भारताने इस्रायलला मास्क, पीपीइ किट व औषधं बनवण्यासाठी कच्चा माल पुरवला होता. तसेच भारतामध्ये रहाणाऱ्या इस्रायली नागरिकांना देखील परत पाठवण्यातही मदत केली होती.