TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 4 मे 2021 – देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आता यंदाच्या आयपीएलमध्येही कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे एकामागोमाग एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. त्यामुळे आयपीएलचे सामने होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र यावर बीसीसीआयचे राजीव शुक्ला यांनी मोठं स्पष्टीकरण दिलंय.

राजीव शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता सुरू असलेल्या आयपीएलचे पर्व सध्या तरी इथे थांबविण्यात येत आहे. परंतु पुन्हा हे सामने कधी घेतले जातील? याच्याबद्दलची माहिती त्यांनी दिलेली नाही. कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांवर परिणाम होत असताना पाहायला मिळत आहेत.

महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत आहेत. अनेक परदेशी खेळाडूंनी आयपीएल सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता हैदराबाद संघामध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर आयपीएलचे या हंगामाचे सामने थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.

कोलकाता नाईट रायडर्सच्या संघातील वरुण चक्रवर्ती आणि संदीप वारियर यांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर स्पर्धेवर संकट घोंगावण्यास सुरुवात झाली होती. चेन्नई सुपर किंग्जच्या संघातही कोरोनाचा शिरकाव झाल्याचे वृत्त आले होते. आता दिल्ली आणि अहमदाबाद येथे असणाऱ्या संघातील काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे.