TOD Marathi

राज्यातलं राजकारण वेगळ्या वळणावर असताना ठाकरे बंधूंच्या मुलाखती यामधील उत्सुकता आणखी वाढवत आहेत. नुकतीच एका वृत्तवाहिनीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुलाखत दिली, (MNS Chief Raj Thackeray) ज्यामध्ये राज ठाकरे यांनी अनेक गोष्टी थेट आणि स्पष्ट मांडल्या. राज ठाकरे यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रीयेनंतर पहिल्यांदाच प्रत्यक्ष रूपाने साधलेला हा मोठा संवाद होता. राज ठाकरेंच्या या मुलाखतीनंतर येत आहे ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मुलाखत. (Interview of Shivsena Chief Uddhav Thackeray to Saamna)

उद्धव ठाकरे यांनी दैनिक ‘सामना’ला मुलाखत दिलेली आहे आणि ती मुलाखत 26 आणि 27 जुलैला प्रकाशित होणार आहे. गेल्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात ज्या घडामोडी झाल्या, त्या सर्व घडामोडींमध्ये ठाकरे बंधू होतेच. नव्या सरकारच्या वेळेस मतदान करण्यासाठी असेल किंवा विधान परिषद, राज्यसभा निवडणुकीसाठी मनसे भाजपच्या बाजूने होती तर शिवसेना राज्यात झालेलं सत्तांतर, शिवसेनेत पडलेली फुट, उद्धव ठाकरे यांना द्यावा लागलेला राजीनामा, शिंदे गटाकडून सातत्याने होणारे आरोप, कायदेशीर लढाई या गोष्टींमुळे चर्चेत आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या मुलाखतीनंतर उद्धव ठाकरे आपल्या मुलाखतीत काय बोलतात याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. या दोन्ही मुलाखतींमध्ये एक मात्र नक्की की ठाकरे बंधूंच्या मुलाखती महत्वाच्या असणार आहेत आणि यामध्ये कोणावर तोफ डागली जाते हेही बघावं लागेल.