नवी दिल्ली: केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात संयुक्त किसान मोर्चाच्या (एसकेएम) ‘भारत बंद’ ला सुरुवात झाली आहे. या बंदला राजकीय पक्षांसह अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. या दरम्यान, शेतकऱ्यांनी विविध महामार्गावरील रस्ते तसेच रेल्वे मार्ग अडवून धरले आहेत. शेतकरी सकाळी ६ ते दुपारी ४ वाजेपर्यंत रस्ते अडवून निषेध करणार आहेत. या आंदोलनाला देशातील जवळपास सर्वच विरोधी पक्षांचा पाठिंबा आहे.
शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी भारत बंदबाबत माहिती दिली आहे. रुग्णवाहिका, डॉक्टरांसह सर्व आपत्कालीन सुविधा सुरू राहतील. आम्ही काहीही बंद केले नाही, आम्हाला फक्त एक संदेश पाठवायचा आहे. आम्ही दुकानदारांना आवाहन करतो की त्यांनी दुकाने आत्ता बंद ठेवा आणि संध्याकाळी ४ नंतरच उघडा. एकही शेतकरी बाहेरून येथे आलेला नाही, असे राकेश टिकैत यांनी म्हटले.
केंद्राच्या तीन कृषी कायद्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गेल्या वर्षी २७ सप्टेंबरला मंजुरी दिली होती. त्यास एक वर्ष पूर्ण होत असताना हा भारत बंद पुकारण्यात आला आहे. सकाळी ६ पासून दुपारी ४ वाजेपर्यंत पाळल्या जाणाऱ्या बंददरम्यान रुग्णालये, औषधांची दुकाने यांच्यासह सर्व अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बंद राहणार आहे.