TOD Marathi

मुंबई: महाराष्ट्रात आलेल्या प्रत्येक पर्यटकाला उत्तम सुविधा मिळाल्या पाहिजेत. यासाठी पर्यटन विभागाने प्रयत्न करावेत. पर्यटकच आपले ब्रँड अम्बॅसिडर झाले पाहिजेत, दुसऱ्याची गरज पडायला नको, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जागतिक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना पर्यटन विभागाला केली.

आगामी काळात पर्यटन विभागाने डेक्कन ओडीसीप्रमाणे सुविधा सुरू करावी. आम्ही आमची कॅबिनेट बैठक रेल्वे किंवा त्या विमानातून करु, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. यावेळी राज्याच्या पर्यटन विभागाला काहीही कमी पडू देणार नाही. राज्य सरकार आणि राज्याचं अर्थखातं त्यांच्या पाठीशी आहे, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

देशभरात जेवढ्या लेण्या आहेत त्यातील सर्वाधिक म्हणजे १२०० पैकी ८०० लेणी महाराष्ट्रात आहेत. यातील 90 टक्के लेण्या अजूनही आपल्याला माहिती नाही. हजारो वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने लेणी कोरल्या तशा आज निर्माण करता येतील का? आपणही एक आजच्या युगातील लेणी तयार केली पाहिजे. केवळ जुनं जतन करणं नाही तर नवंही तयार केलं पाहिजे, ठाकरे यांनी यावेळी महाराष्ट्रातील लेण्यांवर देखील भाष्य केले.