TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 7 ऑगस्ट 2021 – भारत देश अजूनही कोरानाच्या दुसऱ्या लाटेतून पूर्णपणे सावरला नाही. देशामध्ये पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. अशात तज्ज्ञांकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिला जात आहे. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशाची झालेली अवस्था पाहता देशाची चिंता वाढतेय. असे असतानाही कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी भारतानं मोठा टप्पा गाठला आहे. तो म्हणजे.लसीकरणाच्या बाबतीत 50 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. यापुढे हि लसीकरण मोहीम सुरूच राहणार आहे.

देशात आतापर्यंत 50 कोटींहून अधिक कोरोना लसीचे डोस दिलेत. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून दिली आहे. शुक्रवारी भारतात एकूण 43.29 लाख लशीचे डोस दिलेत. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या बाबतीत महत्त्वपूर्ण टप्पा गाठल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी देखील ट्वीट करून प्रतिक्रिया दिलीय.

मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, भारतानं आज कोविड -19 विरूद्धच्या लढाईत महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. आज भारताने लसीकरणात 50 कोटींचा टप्पा पार केलाय. हा आकडा भविष्यात असाच वाढत जाणार आहे. सर्व नागरिकांना #सर्वांनामोफतलस मोहीमेंतर्गत लस मिळत आहे.

याअगोदर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी हि ट्वीट केलं होतं. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, कोरोनाविरूद्धच्या लढाईत भारताने ऐतिहासिक कामगिरी केलीय. देशाने लसीकरणामध्ये 50 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

लसीकरणातील गतीचा उल्लेख करताना मांडवीय म्हणाले, लसीकरणात 10 कोटींचा टप्पा गाठण्यासाठी देशाला 85 दिवस लागले होते. त्यानंतर पुढील 45 दिवसांत 20 कोटींचा आकडा पार केला होता.

तर पुढच्या 29 दिवसांमध्ये 30 कोटींचा टप्पा पार केला. त्यानंतर 24 दिवसांत 40 कोटी आणि पुढील 20 दिवसांत 50 कोटींचा टप्पा पार केलाय.