TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 27 जुलै 2021 – श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. भारताचा अष्टपैलू कृणाल पांड्याला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे भारत आणि श्रीलंका यांच्यात आज (मंगळवारी) होणार होता. मात्र, कोरोनामुळे दुसरा टी-२० सामना पुढे ढकलला आहे. इतर खेळाडूंच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला तर, हा सामना बुधवारी खेळवला जाईल.

कृणालला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे दोन्ही संघ क्वारंटाईन झाले आहेत. त्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. त्याचा अहवाल येईपर्यंत त्यांना क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. त्यानंतर बीसीसीआयनेही ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

भारताच्या श्रीलंका दौऱ्यामध्ये आता केवळ दोन टी-२० सामने शिल्लक आहेत. यापैकी एक सामना आज होणार होता. परंतु, हा सामना आता पुढे ढकलला आहे. त्यामुळे आता पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव हेसुद्धा अडचणीत सापडतील.

इंग्लंडविरुद्ध आगामी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी पृथ्वी व सूर्यकुमारची नुकतीच भारताच्या संघामध्ये निवड झाली होती. श्रीलंका दौऱ्यानंतर हे दोघे इंग्लंडला रवाना होणार आहेत. या दोघांचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यास ते ठरल्याप्रमाणे इंग्लंडसाठी रवाना होतील.