TOD Marathi

CM यांना लिहिलेल्या पत्रात सरनाईक यांनी BJP च्या ‘या’ नेत्याला म्हटलं केंद्राचा ‘दलाल’; म्हणाले, घ्या भाजपशी जुळवून

टिओडी मराठी, मुंबई, दि. 20 जून 2021 – भाजपशी असलेली युती तोडून शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. मात्र, आता पुन्हा भाजपशी जुळवून घ्या, अशी साद शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घातली आहे. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही विनंती केली आहे. त्यामुळे राज्याचं राजकारण तापलं आहे.

प्रताप सरनाईक यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये भाजपमधील काही नेत्यांशी चांगले संबंध आहेत. त्याचवेळी त्यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचं नाव न घेता त्यांना केंद्रीय यंत्रणांचा दलाल म्हटलंय.

कोणताही गुन्हा किंवा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरूय. केंद्रीय तपास यंत्रणेचा दलाल आणि शिवसेनेमुळे ‘माजी खासदार’ झालेल्या नेत्याकडून जी बदनामी सुरु आहे, त्यालाही कुठे तरी आळा बसेल, असेही सरनाईक यांनी पत्रात नमूद केलंय.

या दरम्यान आम्हाला टार्गेट करीत असताना आमच्या कुटुंबियांवर सुध्दा आघात होत आहेत. खोटे आरोप होताहेत. एका केसमधून जामीन मिळाला की, तात्काळ जाणीवपूर्वक दुसऱ्या केसमध्ये गुंतवणे, त्यातून बाहेर आलो की तिसऱ्या केसमध्ये गुंतवणे अशा प्रकारचे जाणीवपूर्वक काम या तपास यंत्रणा करीत आहेत. आपल्या एका निर्णयामुळे हे कुठेतरी थांबेल, असे सरनाईक यांनी म्हटलंय.