शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर सध्या मोठ्या वादात अडकले आहेत. बांगर यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या हिंगोली आगार प्रमुखांना धमकी दिल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एसटीच्या वाहकाला मारहाण करण्याची धमकी बांगर यांनी आगार प्रमुखांसमोर दिली आहे. खरंतर, हिंगोलीतल्या शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थीनी एसटीच्या बस वाहकाची तक्रार घेऊन आमदार संतोष बांगर यांच्याकडे गेल्या होत्या. विद्यार्थिनींची तक्रार ऐकल्यानंतर संतापलेल्या आमदार बांगर यांनी तातडीने एसटीच्या आगार प्रमुखांना बोलावून घेतलं आणि त्यांची खरडपट्टी काढली. तसेच विद्यार्थिनींना त्रास देणाऱ्या बस वाहकाला मारहाण करण्याची धमकी त्यांनी यावेळी दिली.
हिंगोली येथील शाळा आणि महाविद्यालयात शिकणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाची बस आहे. परंतु, ही बस बऱ्याचदा उशिराने सोडली जाते, अशी तक्रार घेऊन डिग्रस, हिवरा, बोरजा, लिंबाळा, दुघाळा, पिंपरी येथील विद्यार्थीनींनी थेट आमदार संतोष बांगर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्यासमोर तक्रारी मांडल्या. तसेच बस वाहक त्यांच्याशी चुकीच्या पद्धतीने वागत असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यानंतर आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीतल्या आगार प्रमुखांना बोलावून घेतलं आणि त्यांची विद्यार्थिनींसमोरच खरडपट्टी काढली.
हेही वाचा “ …आधी चक्की पिसींग आता दादांसोबत किसींग; बैलगाडीभर पुरावे आणि… दानवेंनी सगळचं काढलं”
आमदार संतोष बांगर यांनी विद्यार्थिनींच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि ते बसच्या आगार प्रमुखांना म्हणाले, तुमचा कंडक्टर म्हणतोय, तुम्ही पोरं असता तर तुम्हाला मारलं असतं, हे बोलणं चुकीचं आहे, त्या मुली ज्या पद्धतीने सांगत आहेत ते ऐका. कंडक्टर म्हणतो तुमच्या बापाची बस आहे का? तुम्हाला सांगतो अशा कंडक्टरला मी पायाखाली तुडवेन, तुम्हाला माहिती आहे, मी जेवढा चांगला आहे तेवढाच वाईट आहे. मला काही कमी जास्त वाटलं तर मी त्या कंडक्टकरला लोळंस्तोवर मारेन हे ध्यानात ठेवा. या लेकरांची गैरसोय झाली नाय पाहिजे. हे विद्यार्थी ४.३० वाजता तिथे आल्यावर ५ वाजेपर्यंत बसमध्ये बसले पाहिजेत. या पोरी बसमध्ये बसल्यावर कंडक्टर म्हणतो, ‘तुम्ही पोरं असता तर तुम्हाला मारलं असतं’, पण मी अशा लोकांना तुडवेन.