TOD Marathi

 मुंबई | ‘येत्या जानेवारी महिन्यात अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिराचे उद्घाटन आहे. या कार्यक्रमात देशभरातून लाखो कारसेवक, रामभक्त सहभागी होणार आहेत. रामलल्लाचे दर्शन घेवून कारसेवक निघतील, तेव्हा दंगली घडविल्या जातील. यात काही कारसेवकांचा जीवही जाऊ शकतो. त्या भरोशावर देशातील सत्तेसाठी दावा ठोकला जाईल,’ असा खळबळजनक दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी केला.

वडेट्टीवार यांनी यावेळी केंद्र व राज्यातील महायुती सरकारवर टीका केली. ‘२०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पुलवामा येथे झालेल्या स्फोटातील स्फोटके कुठून आली, याचा शोध अजून लागलेला नाही. आरोपी मिळाले नाहीत. गुजरातच्या गृहमंत्र्यांची हत्या झाली, त्या प्रकरणातील आरोपीही मिळाले नाही, हे कसे काय शक्य आहे,’ असाही प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

हेही वाचा ” …आधी चक्की पिसींग आता दादांसोबत किसींग; बैलगाडीभर पुरावे आणि… दानवेंनी सगळचं काढलं

‘केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीतून मुख्य सरन्यायाधीशांना वगळण्याचे विधेयक मांडण्यात आले आहे. १९२७चा वन कायदा बदलला आहे. त्यामुळेच आता उद्योगपतींना खाण वाटप सोपे झाले आहे,’ असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, संदीप गड्डमवार, डॉ. विजय देवतळे आदी उपस्थित होते.

जानेवारीत अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनानंतर परत येणाऱ्या कारसेवकांना दंगल घडवून ठार मारत पुन्हा एकदा भाजप सत्तेवर चढण्याची शक्यता आहे.असे धक्कादायक विधान राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुरात केले होते.यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जबाबदार व्यक्तीने असे बेजबाबदारपणे वक्तव्य करणे चुकीचे आहे. त्यांच्याकडे तशी माहिती असेल तर त्यांनी ती सरकारला पुरवावी. घर चलो अभियानाला चंद्रपुरातुन आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अभियानाला सुरवात झाली.यावेळी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर सह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.