टिओडी मराठी, दि. 23 जून 2021 – काही प्रसारमाध्यमं, टीव्हीवाले करोनाबद्दल चुकीची माहिती पसरवत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे, असा आरोप तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केलाय. चुकीची माहिती देणाऱ्या ‘या’ टीव्हीवाल्यांना माझा शाप लागेल, असे त्यांनी म्हंटलं आहे. या कोरोना काळात आपण केवळ Paracetamol आणि अँटिबायोटिक औषधं खाऊन बरे झालो आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.
भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेने दोन-तीन महिन्यात धुमाकूळ घातला होता. मात्र, सध्या ही लाट आता ओसरताना दिसत आहे. अशावेळी करोनाची योग्य माहिती लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम माध्यमांनी केलं आहे. मात्र, या माध्यमांवर तेलंगणाचे मुख्यमंत्री नाराज झाले आहेत. त्यांनी ही नाराजी एका कार्यक्रमातून उघड केली आहे.
चंद्रशेखर राव यांना यंदा एप्रिलमध्ये करोनाची लागण झाली होती. त्यांनी असा दावा केला आहे की, केवळ दोन औषधांच्या सेवनाने ते आठवड्याभरात करोनातून बरे झालेत. बारंगल इथल्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी ते म्हणाले, ‘माहित नाही कोण काळी बुरशी?, पिवळी बुरशी अशा आजारांबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहेत. कुठली वृत्तवाहिनी आहे की कोणता न्यूजपेपर आहे माहित नाही?. ही बुरशी जिवंत आहे की निर्जीव? पण लोक या गोष्टी ऐकून मरत आहेत. मी सांगतो, या टीव्हीवाल्यांना, काही पेपरवाल्यांना माझा शाप लागेल.’
आपल्याला करोनाची लागण झाली होती, त्यावेळचा अनुभव सांगताना राव म्हणाले, त्यांना डॉक्टरांनी केवळ दोन गोळ्या दिल्या होत्या. आणि ते आठवड्यात बरे झाले. राव म्हणाले, प्रसारमाध्यमं लोकांना घाबरवत आहेत. अशाप्रकारे विनाकारण भीती पसरवण्याची काय गरज आहे?
पुढे राव म्हणाले, मीडिया खरी परिस्थिती चुकीच्या पद्धतीने मांडत आहेत. करोना नसतानाही सरकारी रुग्णालयांत जागा मिळत होती का? डॉक्टर कधीच रुग्णांना उपचार नाकारत नाहीत. कारण, त्यांना माहित आहे की, गरीब केवळ सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार घेऊ शकतात. त्यामुळे ते रुग्णांना जमिनीवर बसवतात आणि त्यांचे उपचार करतात. मात्र, ही प्रसारमाध्यमं काय करतात?, फोटो काढतात आणि सांगतात की रुग्णांना सरकारी रुग्णालयांमध्ये जमिनीवर झोपायला लागतंय.