TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 21 जुलै 2021 – कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने लसीकरण मोहिमेवर अधिक भर दिला आहे. आता मुंबईतील लसीकरण वेगाने करण्यासाठी महानगरपालिका आणि राज्य सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. आता 1 ऑगस्ट 2021 पासून मुंबईमध्ये 75 वर्षांवरील अंथरुणाला खिळलेल्या ज्येष्ठ नागरीकांसाठी मुंबई महानगरपालिका घरोघरी जाऊन लसीकरण करणार आहे.

मुंबई महानगरपालिकेची ही विशेष मोहीम आहे. राज्य सरकारने याबाबत मुंबई उच्च न्यायालयाला माहिती दिली असून याबाबत न्यायालयाने राज्य सरकारच्या निर्णयावर समाधान व्यक्त केलं.

मुंबईमध्ये अंथरुणाला खिळलेल्या ज्येष्ठ नागरीकांना लसीकरण करण्यासाठी महानगगपालिकेकडे अनेक नोंदी आल्यात. यामुळे महानगरपालिका सज्ज झालीय.

मुंबई महानगरपालिका व राज्य सरकार वेगाने लसीकरण करण्यासाठी अधिक प्रमाणात लसीकरण मोहीम राबवत आहेत. परंतु गंभीर आजार असलेले व अंथरुणाला खिळलेल्या नागरीकांना लसीकरण केंद्रापर्यंत येणं शक्‍य नाही, त्यामुळे या नागरीकांचे घरोघरी जाऊन लसीकरण करावे, अशी मागणी केली जात होती.

मुंबई महापालिकेकडे सध्या हजारो ज्येष्ठ नागरीकांची घरच्या लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. मुंबई महानगरपालिका घरोघरी लसीकरण करण्यासाठी आदेशाच्या प्रतिक्षेत होती.

परंतु आता उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवल्यामुळे मुंबई महानगरपालिका व राज्य सरकार संयुक्तपणे घरोघरी लसीकरण मोहीम राबविणार आहे.