टिओडी मराठी, हैती, दि. 7 जुलै 2021 – कॅरेबियन बेटांवर असलेल्या देशांपैकी हैती एक देश आहे. या हैतीच्या राष्ट्राध्यक्षांची त्यांच्या घरात घुसून हत्या केली आहे. हि जग हादरवणारी ही घटना आहे. ‘काही स्पॅनिश आणि इंग्लिश बोलणाऱ्या परकीय हल्लेखोरांनी राष्ट्रपती जोवेनल मॉइस यांच्यावर घरात घुसून हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले असून रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला, असे प्रभारी पंतप्रधान क्लाउड जोसेफ यांनी सांगितलं आहे.
राष्ट्रपतींच्या निवासस्थानी अंदाधुंद गोळीबार केला असावा. या हल्ल्यात मॉइस यांची पत्नीसुद्धा जखमी झाली. त्यांच्याही पोटात गोळी लागली आहे, असे पंतप्रधान जोसेफ यांनी सांगितले आहे. या घटनेने देशासह जग हादरले आहे. सोशल मीडियावर मॉइस यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
जनतेने संयम बाळगावा. लोकशाहीचा अंतिम विजय होईल, असे प्रभारी पंतप्रधान क्लाउड जोसेफ म्हणाले आहेत. प्रभारी पंतप्रधानपदावर तीन महिन्यापासून असणारे जोसेफ हेच आता देशाचे प्रमुख असणार आहेत.
अमेरिका खंडातला सर्वांत गरीब देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हैतीत काही दिवस राजकीय तणाव सुरू होता. जोवेनल मॉइस यांची टर्म संपल्यानंतर ही ते राष्ट्राध्यक्षपदावर होते. 2018 मध्ये खरंतर या देशात सार्वत्रिक निवडणुका होणं अपेक्षित होतं.
पण, राजकीय वादंग आणि अराजक सदृश वातावरणामुळे या निवडणुका लांबल्या गेल्या. या देशात गरिबीबरोबर गुन्हेगारी वाढलेली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा अभाव आहे. निवडणुकांसह या देशाच्या घटनेतसुद्धा बदल करण्यास सूचविण्यात आलं आहे. हे बदल होण्यापूर्वीच राष्ट्रपतींची हत्या झालीय.