TOD Marathi

पुणे :

प्रसिद्ध ज्योतिष अभ्यासक चंद्रकांत शेवाळे संपादित ‘ग्रहांकित’ या दिवाळी अंकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन रविवारी उत्साहात झाले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर, फलज्योतिष अभ्यास मंडळाचे संवर्धक पं. विजय जकातदार,म.सा.प. चे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, संपादक चंद्रकांत शेवाळे, दिवाळी अंकाचे वितरक वीर न्यूज एजन्सीचे बंडू वीर, उद्योजक नंदकुमार शेवाळे यावेळी उपस्थित होते. ४५ वर्षात १९ वेळा दुसऱ्या आवृत्तीचा विक्रम या दिवाळी अंकाने केला आहे. (Grahankit Diwali Magazine Published)

‘केवळ दोन दिवसातच ग्रहांकित – दिवाळी अंकाचे दुसऱ्यांदा प्रकाशन होत आहे. याचाच अर्थ ग्रहांकित सर्व सामान्यांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असल्याचा पुरावा होय ! गेल्या ४५ वर्षांच्या वाटचालीत ग्रहांकितने हा विक्रम १९ वेळा केला आहे. काही वर्षी ८ पेक्षाही जास्त आवृत्त्या निघाल्या असल्याने दिवाळी अंकाच्या विश्वात ग्रहांकित एक मानाचा अंक मानला जातो. (Diwali Magazines Maharashtra) ग्रहांकित बाजारात आल्याशिवाय दिवाळी अंकाचा उत्सव भरल्यासारखा वाटत नाही असे अनेक वितरक म्हणतात. त्याची सत्यता पटते’, असे उद्गार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर यांनी दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करताना काढले. यावेळी बोलताना पाटोदकर पुढे म्हणाले, “सर्वजण दिवाळी सण मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा करतात. दिवाळी अंकाचे वाचन हा एक त्या आनंदाचा भाग असतो. विविध विषयावरील अंकाचा आस्वाद वाचक घेत असतात. एक प्रकारे वाचन संस्कृतीचे जतनच म्हणावे लागेल. ”

भालचंद्र ज्योतिर्विद्यालय येथे संपन्न झालेल्या प्रकाशनावेळी अध्यक्षस्थानी फलज्योतिष अभ्यास मंडळाचे संवर्धक-पंडीत विजय श्रीकृष्ण जकातदार उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून म.सा.पा. चे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे उपस्थित होते.

प्रकाश पायगुडे यांनी दिवाळी अंकाच्या संपादकांच्या कष्टाची व कल्पकतेची स्तुती केली. या अंकांना शासकीय जाहिरातीबरोबरच मराठी उद्योजकांनी जाहिरात देवून प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मत व्यक्त केले. ‘ग्रहांकित’ हे मासिक अथवा दिवाळी अंक नसून ते पुस्तकाप्रमाणे वाचक जपून ठेवतात, हे ‘ग्रहांकित’चे वैशिष्ट्य म्हणावे लागेल असे विचार अध्यक्ष पं. विजय जकातदार यांनी व्यक्त केले.