TOD Marathi

पुणे | दरवर्षी प्रमाणे यंदाही गोकुळाष्टमी हा सण देशभरात मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. विशेषतः राज्यात गोविंदा पथकांची हा सण साजरा करण्यासाठी जय्यत तयारी सुरु झाली आहे, राज्यात विविध ठिकाणी थर रचण्याचा कसून सरावही सुरु झाला आहे. गेली काही वर्षे पुरुषांबरोबर महिला पथकही विविध शहरांमध्ये सहभागी होत असल्याचं चित्र आहे. आता या उत्सवात तृतीयपंथीयही सहभागी होणार आहेत.

तृतीयपंथी यांचा सहभाग असलेले १०० जणांचे तब्बल चार संघ हे पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये तयार करण्यात आले असून त्यांनी कसुन सरावालाही सुरुवत केली आहे. प्रत्येक संघात २५ तृतीयपंथीय सदस्यांचा सहभाग असणार आहे. येत्या सात सप्टेंबरला पुण्यातील नारायण पेठेतील गोगटे प्रशालेच्या मैदानावर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दहीहंडी फोडण्यात येणार आहे. ‘दीपस्तंभ’चे विश्वस्त आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर, सामाजिक कार्यकर्त्यां शर्वरी गावंडे आणि शिवप्रताप संस्था यांच्या माध्यमांतून तृतीयपंथी यांच्या दहीहंडीचे विशेष आयोजन करण्यात आले आहे.
समाजातील प्रत्येक घटकाला जगण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे तृतीयपंथी यांना देखील आहे. आज तृतीयपंथी विविध क्षेत्रात काम करताना दिसत आहे. ही चांगली बाब असून समाजाने त्यांना आपल्या कुटुंबातील व्यक्ती प्रमाणे स्वीकारले पाहिजे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही यंदा प्रथमच तृतीयपंथी यांचे गोविंदा पथक तयार करण्याचा निर्णय घेतला आणि त्या कामाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जवळपास १०० तृतीयपंथी एकत्रित आले असून आता हे सर्व सात सप्टेंबर रोजी दहीहंडी फोडण्यास सज्ज झाले आहे. यामधून समाजाला एक संदेश जाण्यास मदत होणार आहे, अशी प्रतिक्रिया दीपक मानकर यांनी यावेळी दिली.
यावेळी तृतीयपंथी कादंबरी म्हणाल्या की, आजपर्यंत आम्हा तृतीयपंथी यांना वेगळ्या नजरेने पाहिले जात होते. पण मागील काही महिन्यात आम्हाला सन्मानाची वागणूक मिळत आहे हे पाहून आनंदाची गोष्ट वाटते. तसेच आता पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने तृतीयपंथी यांना सुरक्षा रक्षक होण्याचा मान दिला. त्याबद्दल प्रशासनाचे आभार मानते आणि आम्हाला मुख्य प्रवाहात येण्यास यातून मदत झाली आहे. आजपर्यंत अनेक सण उत्सवांमध्ये आम्ही सहभागी होत नव्हतो. पण आता गोविंदा पथकात सहभागी होण्यास मिळत आहे. हे पाहून खूप छान वाटते आणि असे उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्त्यां शर्वरी गावंडे म्हणाल्या की, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरातील तृतीयपंथी यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहे. त्यापैकी एक तृतीयपंथी यांचा गोविंद पथक तयार करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याकरता सर्वांना विशेष प्रशिक्षण दिले गेले आहे असून या दहीहंडीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडून देखील दखल घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.