TOD Marathi

उठा उठा दिवाळी आली… बोनस घ्यायची वेळ झाली. सोशल मीडियावर आपणही दिवाळी बोनसची मीम पाहत असाल, शेअर करत असाल. पण हा दिवाळी बोनस प्रकार नक्की सुरु कसा झाला हे तुम्हाला माहित आहे का? दिवाळी म्हणजे जितकी मज्जा मस्ती तितका खर्च. (Diwali Bonus in India) वर्षातून एकदाच येणारा सण म्हणून खर्चात आखूडता हात जरा सैल सोडावा अशी आपलीही इच्छा असते पण बजेटचे आकडे काही केल्या जुळत नाहीत, अशावेळी पगाराच्या व्यतिरीक्त मिळणारी छोटी का होईना पण एक बोनस रक्कम आपली तारणहार ठरते. याच दिवाळी बोनसचा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत.

आपल्याला माहित असेल पूर्वी मुंबईला गिरणगाव म्हणूनही संबोधले जात होते. कपड्याच्या, पिठाच्या या गिरण्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठवड्याला पगार दिला जात होता. या हिशोबानुसार प्रत्येकाला ५२ आठवड्यांचे ५२ पगार मिळत होते. पण ब्रिटिश आले आणि त्यांनी आठवड्या ऐवजी महिन्याचा पगार देण्याची पद्धत सुरु केली, आता ५२ ऐवजी ४८च आठवड्यांचा पगार कर्मचाऱ्यांना मिळू लागला. तुम्हीच हिशोब करा, जर महिन्यात ४ आठवडे आहेत तर ५२ च्या हिशोबाने १३ महिन्यांचा पगार मिळायला हवा होता पण महिन्याच्या आकडेवारीनुसार ब्रिटिशांनी १२ च महिन्याचा हिशोब सुरु केला.

जेव्हा हा प्रकार कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला तेव्हा त्यांनी महाराष्ट्रभर आंदोलन करून अन्यायावर उत्तर मागितले. १९३० ते १९४० दरम्यान ब्रिटिशांनी या १३ व्या पगाराचे वाटप कसे करायचे याबाबत कामगार नेत्यांशी चर्चा केली. यात त्यांनी दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण असल्याने त्या महिन्यात १३ वा पगार बोनस म्हणून देण्याचे ठरवले. ३० जून १९४० पासून याची अंमलबजावणी करण्यात आली.

यासाठी अर्थात बाबासाहेब आंबेडकरांनी मोठी भूमिका बजावली होती. (Dr. Babasaheb Ambedkar) बाबासाहेबांनी फक्त दलितोद्धाराचेच कार्य केले नाही तर समाजातील प्रत्येक जाती, धर्मातील शोषित वर्गासाठी काम केले हे आपण समजून घ्यायला हवे. बाबासाहेब नक्की कोणाचे होते हा प्रश्न विचारलाच जात असेल तर बाबासाहेब शोषित समाजाचे होते, मग तो कोणीही असो. व याच उद्दात विचारातून त्यांनी कामगारांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी १९३६ साली स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली.

भारतात पहिल्या महायुद्धाच्या (First world war) काळापासून सणाच्या आधी महागाई भत्ता देण्याची पद्धत रूढ झाली होती.

बाबासाहेब आपल्या भाषणामधून कायम प्रतिपादन करायचे की ,

“आजवर कामगारांना जो महागाई भत्ता मिळत होता तो प्रचंड अपुरा आहे. भडकत्या महागाईला कामगार तोंड देऊ शकणार नाहीत म्हणून वाढत्या महागाई निर्देशकांच्या आधारावर महागाई पूर्तता करावी. ”

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बाबासाहेबांच्या स्वतंत्र पक्षाच्या प्रयत्नामुळे कामगारांना उत्पादनसंस्थेतील नफ्यातही आपला वाटा आहे याची जाणीव झाली.

यातूनच कामगारांना ठराविक हिस्सा मिळावा, ही ‘बोनस’ची कल्पना पुढे आली.

अलीकडे काही कंपनी या दिवाळी बोनस देण्यासाठी टाळाटाळ करतात पण अशावेळी तुमचा हा हक्क त्यांच्या लक्षात आणून द्या.

दिवाळीच्या तुम्हाला बोनस भरभरून शुभेच्छा!