TOD Marathi

दिवाळी म्हटलं की आठवतं आकाशदिवा, पणत्या, रांगोळ्या, अभ्यंगस्नान, फटाके, किल्ला आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फराळ! (Diwali food in Maharashtra and India) एकवेळ दुसरं काही नसलं तरी चालतंय पण फराळ हा पाहिजेलच राव! आपल्या आजोबा-पंजोबांच्या आधीपासून हे फराळाचे पदार्थ महाराष्ट्रातील घराघरांत तयार होत आले आहेत. जरी घरी करायला जमले नाही तरी हे पदार्थ विकत का होईना पण आणले जातातच.

शेतात राबून दमलेल्या थकलेल्या शेतकऱ्यांना थोडा निवांतपणा मिळावा, थोडं गोडधोड खाऊन जीभेचे चोचले पुरवता यावे, थंडीच्या काळात आवश्यक असलेली स्निग्धता मिळावी म्हणून ही फराळाची ही निराळी परंपरा आपल्याकडे सुरू झाली. फराळाला सुद्धा त्याचा एक स्पेशल इतिहास आहे. (History of Food) अगदी उपनिषद काळातही ‘भोजनकुतूह्ल’ या ग्रंथात दिवाळीच्या फराळाचा पुसटसा उल्लेख आढळतो.

तुम्हाला सांगितलं तर खरं वाटणार नाही पण मराठी परंपरेचा भाग असणारे हे पदार्थ इथल्या मातीतले नाहीयेत. अनेक राज्यातून हे पदार्थ महाराष्ट्रात आले आणि आपल्या मातीत इतके घट्ट रुजले आहेत की हे पदार्थ आपले नाहीत हे आपल्याला खरं वाटणारही नाही. (Popular food in Maharashtra in festivals)

चला तर मग याच काही पदार्थांची एक सफर करुन येऊया.

१. लाडू

दिवाळीत आपल्याकडे हमखास रवा किंवा बेसनाचे लाडू चवीनं बनवले जातात. हा मराठीतला लाडू हा हिंदीतल्या लड्डूचा अपभ्रंश होऊन तयार झालाय.

आज ज्याला आपण लाडूचा आकार म्हणतो तो पूर्वी औषधाच्या डोससाठी सोयीस्कर म्हणून वळला जायचा. म्हणून त्याचा आकार आजही गोलच असतो.

त्यानंतर स्वयंपाकघरात प्रयोग होत गेले आणि बेसन, रवा यात अन्य जिन्नस घालून त्यांचे लाडू केले जाऊ लागले. आपल्यावर परकीय आक्रमणे झाली तेव्हा हाच लाडू शाही पदार्थ म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यात सुकामेवा वगैरे घालण्यास सुरुवात झाली.

बुंदी खरं तर मूळ राजस्थानची! त्यामुळे बुंदीचा लाडू खरं तर राजस्थानी. पण दिवाळीत हा लाडूही अनेक घरात मोठ्या आवडींन बनवला जातो.

तर असा हा लाडू महाराष्ट्रात आला, स्थिरावला.

२. चकली

दुसरा पदार्थ आहे चकली. चकली संपूर्ण भारतात विविध नावांनी ओळखली जाते. मुरुक्कू, चक्रिका, चकरी अशी चकलीची विविध नावं. हा पदार्थ देखील मूळचा मराठी नाहीये.

ही चकली दक्षिण भारतातून महाराष्ट्रात आली आणि या मराठी मातीचीच होऊन गेली. उपनिषदकाळात चकलीला चक्रिका हे नाव होतं. चक्रासारखी गोल गोल म्हणून तिला चक्रिका म्हटलं जाऊ लागलं ! तसेच मुरुक्कू हा शब्द तामिळ भाषेतला आहे. त्याचा मराठीतला अर्थ होतो वेटोळी. गोल वेटोळी ती महाराष्ट्रात येऊन चकरी झाली आणि चकरीचा अपभ्रंश पुढे चकली असा झाला.

जगात जिथे जिथे म्हणून तामिळ लोक आहेत तिथे चकली हा पदार्थ खाल्ला जातो. अगदी श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर मध्येही चकली खाल्ली जाते.

३. करंजी

आपण मराठी लोक कुठल्याही शुभकार्याला शकुनाची म्हणून करंजी किंवा कानवले, पुरणाचे कडबू करतो. फराळात करंजीला मानाचं स्थान असतं. अगदी आजही घराघरांत फराळाचे पदार्थ करण्याची सुरुवात करंजीनेच होते.

उत्तर भारतात तर करंजा त्यांच्या शुभकार्यात आणि सणांना आवर्जून केले जातातच. प्राचीन काळी करंजी शष्कुली या नावाने ओळखली जायची.

उत्तरप्रदेशातून ही करंजी राजस्थाननंतर गुजरात असा प्रवास करत करत महाराष्ट्रात आली आणि शकुनाची म्हणून पवित्र मानली जाऊ लागली.

उत्तरप्रदेशात गुजिया तर बिहारमध्ये पुरुकीया, छत्तीसगडमध्ये कुसली तर गुजरातमध्ये घुघरा अशी करंजी विविध नावांनी भारतात सगळीकडे आपली ओळख टिकवून आहे.

४. अनारसा

सुगरणीच्या पाककौशल्याची परीक्षा बघणारा पदार्थ म्हणजे अनारसा. जिला अनारसा अगदी व्यवस्थित जमला ती गृहलक्ष्मी सुगरण असं जूनिपुरानी माणसं म्हणायची.

महाराष्ट्रात लक्ष्मीपूजनाला नैवेद्याला आवर्जून केला जाणारा हा पदार्थ मूळचा बिहारचा आहे.

महाराष्ट्राव्यतिरिक्त अनारसा केवळ बिहारमध्येच केला जातो. तिकडं मानाचा असणारा हा पदार्थ आपल्याकडे मात्र दिवाळीत बराच भाव खाऊन जातो.

५. कडबोळी

चकलीच्या बरोबरीने फराळाच्या ताटात स्थान मिळवून असलेली कडबोळी हा पदार्थ मराठी नाही असे आपण स्वप्नात देखील म्हणणार नाही. पण ह्या पदार्थाचे मूळ कर्नाटकात सापडते.

कर्नाटकी कडबूच्या जवळ जाणारी ही कडबोळी आहेत. अर्थात कर्नाटकी कडबूची कृती पूर्णपणे वेगळी आहे तरीही कडबूचा व कडबोळीचा एकमेकांशी काहीतरी संबंध असावा असे म्हणता येईल. कर्नाटक व महाराष्ट्र एकमेकांचे शेजारी आहेत. त्यामुळे काळाच्या ओघात एकमेकांच्या खाद्यसंस्कृतीवर एकमेकांचा परिणाम होणार हे तर गृहीत धरलेच पाहिजे.

तर असे हे फराळाचे पदार्थ जरी मूळचे मराठी नसले तर आता मात्र त्यांच्याशिवाय आपले फराळाचे ताट पूर्ण होत नाही. तर या दिवाळीत हे पारंपरिक पदार्थ नक्कीच खा आणि दिवाळी आनंदाने उत्साहाने साजरी करा!