TOD Marathi

राज्यात सध्या मोठा सत्तासंघर्ष आहे. शिवसेनेच्या ४० पेक्षा जास्त आमदारांनी केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं आहे. (Shivsena MLA) सरकार कोसळण्याची भीती निर्माण झाल्याने सत्ताधारी गोटात अस्वस्थता निर्माण झाल्याने विविध खात्याच्या मंत्र्यांकडून निर्णयांचा धडाका सुरू असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar writes a letter to Governor) यांनी याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहीत तक्रार केली होती. दरेकर यांच्या या तक्रारीची अखेर राज्यपालांनी दखल घेतली आहे.

‘राज्यातील अस्थिर राजकीय स्थिती आणि त्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून अंधाधुंद घेतले जात असलेले निर्णय, त्याचे जारी होत असलेले जीआर आणि त्यात तातडीने हस्तक्षेप करण्याबाबत मी राज्यपाल भगतसिंह कोश्यारीजी यांना पत्र पाठवलं आहे,’ अशी माहिती विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली होती. त्यानंतर राजभवनातून हालचाली सुरू झाल्या असून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारला याबाबत विचारणा केली आहे.

राज्यात मंत्र्यांकडून घाईघडबडीत निर्णय घेतले जात असल्याच्या आरोपावर स्पष्टीकरण देण्यात यावं, असं राज्यपालांकडून सरकारला कळवण्यात आलं आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना गेल्या काही दिवसांपूर्वी करोना संसर्ग झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र नुकतीच त्यांनी करोनावर मात केली आणि आपल्या नियमित कामांना सुरुवात केली आहे. त्यानंतर लगेच राज्यपालांनी सरकारला मंत्र्यांकडून घेण्यात आलेल्या निर्णयांबाबत स्पष्टीकरण मागितलं आहे. यावर राज्य सरकारकडून काय उत्तर दिलं जातं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.