TOD Marathi

एक आगळावेगळा सत्तासंघर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात (maharashtra political crisis) सध्या सुरू आहे. महाराष्ट्रातील सत्तानाट्याच्या केंद्रस्थानी आल्यानंतर एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांनी नवनवीन डावपेचांना सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटीत आमदारांसोबत आहेत. दीपक केसरकर (MLA Deepak Kesarkar) बंडखोर आमदारांची बाजू विविध माध्यमांसमोर मांडत आहेत. मात्र आज स्वतः अचानक एकनाथ शिंदे माध्यमांसमोर आले. ते काही आमदारांसोबत रॅडिसन ब्लू हॉटेलच्या आवारात उतरले.

यावेळी त्यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाबद्दल बोलताना थेट मंत्री आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं. आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील १६ आमदार आमच्या संपर्कात असल्याचं सांगितलं होतं. याला शिंदेंनी हॉटेलच्या आवारातूनच प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. ठाकरेंनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांनी कोण आमदार संपर्कात आहेत हे सांगावं. त्यांची नावं सांगा, असं शिंदे म्हणाले.
आमदार तुमच्या संपर्कात असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. परंतु सर्व ५० आमदार या ठिकाणी स्वत:च्या इच्छेने आले आहेत. त्यांना कोणीही जबरदस्ती नाही केली. ते सुरक्षित आहेत. बाळासाहेबांची खरी शिवसेना हीच आहे, असंही शिंदे म्हणाले.