TOD Marathi

राज्यात सध्या मोठा सत्ता संघर्ष सुरू आहे. या रंगलेल्या सत्तानाट्यात एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेकडून एकमेकांविरुद्धच राजकारण केले जात आहे. एकीकडे राज्यपालांनी ठाकरे सरकारने (Thackeray Government) गेल्या काही दिवसांत घाईगडबडीत घेतलेल्या निर्णयांची माहिती मागवली असतानाच आता ठाकरे सरकारनेही आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. बंडखोर मंत्र्यांची खाती काढून घेण्यात आली असून, त्यांनी गेल्या महिन्याभरात घेतलेल्या निर्णयांच्या सर्व फायली ताब्यात घेण्याची प्रक्रिया मुख्यमंत्री कायार्लयाने (CMO Maharashtra) सुरू केली आहे. त्यामुळे आता या सर्व मंत्र्यांवर कारवाई होण्याचे संकेत मिळू लागल्याची चर्चा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या वर्तुळात रंगली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सोमवारी शिवसेनेच्या सर्व बंडखोर मंत्र्यांकडील खाती काढून घेतली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ठाकरे सरकारने बंडखोरांना आणखी एक जोरदार धक्का दिला आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वच मंत्र्यांनी गेल्या महिनाभरात मंजूर केलेल्या सर्व फाइल्स ताब्यात घेण्यात आल्या आहेत. गेल्या महिन्याभरातील सर्व फाइल्स जमा करण्याचा आदेश मुख्यमंत्री कार्यालयाने शिंदे यांच्या कार्यालयाला दिला. एकनाथ शिंदे यांनी १ जूनपासून मंजूर करून घेतलेल्या नगरविकास तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (सार्वजनिक उपक्रम) सर्व फाईल्स तातडीने घेण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता या मंत्र्यांनी घेतलेल्या सर्व निर्णयांची तपासणी होईल, असेही सांगितले जात आहे.