टिओडी मराठी, प्लेसरविले, दि. 20 ऑगस्ट 2021 – उत्तर कॅलिफोर्नियाच्या जंगलातील वणव्याची आग अजून नियंत्रणात आलेली नाही. अकरा हजार कर्मचारी ही आग विझवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. अमेरिकेच्या वन विभागाने त्या भागातील नऊ राष्ट्रीय वने 22 ऑगस्ट पासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय.
या आगीची झळ अनेक घरांना आणि इमारतींना बसली आहे. त्यामुळे तेथून हजारो नागरीकांना पलायन करावे लागले आहे.
उत्तर कॅलिफोनिर्यातील जंगलाला लागलेल्या आगीच्या झळा लांब अंतरापर्यंत जाणवत आहेत. हा वणवा अधिक धोकादायक होताना दिसून येत आहे. उत्तर सिएरा, नेवाडा आणि दक्षिण कॅसकेड्स या जंगलांना 13 जुलैला आग लागली होती. ती आता 1060 चौरस मैल परिसरामध्ये पसरली आहे.
ही आग आत्तापर्यंत 35 टक्के विझली आहे. अजूनही आगीचा बराच भाग विझवण्यात आलेला नाही. या वणव्यात एकूण 1200 इमारती आणि 649 घरे जळून खाक झालीत. तर आगीच्या अन्य नुकसानीचा अजून अंदाज घेण्याचे काम सुरू आहे.