टिओडी मराठी, दि. 20 ऑगस्ट 2021 – एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीसंदर्भात केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. प्रचंड कर्जात बुडलेल्या सरकारी विमान कंपनी एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीची प्रक्रिया ट्रॅकवर असून त्यासाठी आर्थिक बोली लागल्यास पुढील पाऊल उचलले जाणार आहे, असे मत त्यांनी मांडले आहे. तसेच 15 सप्टेंबरपर्यंत या प्रक्रियेचे पुढचे पाऊल उचलले जाणार आहे, असेही ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले आहे.
इंदूरमध्ये सिंधिया म्हणाले, एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीसाठी आमची प्रक्रिया ट्रॅकवर असून यासाठी आर्थिक निविदा 15 सप्टेंबरपर्यंत आल्या पाहिजेत. या निविदा मिळाल्यानंतर पुढील पाऊल उचलले जाणार आहे.
देशामध्ये ड्रोन उडवण्याच्या नियमांची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने सरकार वेगाने वाटचाल करत आहे. आम्ही संरक्षण मंत्रालय आणि गृह मंत्रालयाशी सल्लामसलत करून ड्रोन ऑपरेशनसाठी नियम बनवलेत.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, आम्ही ड्रोन ऑपरेशनसाठी देशाला लाल, हिरव्या आणि पिवळ्या झोनमध्ये विभागणार आहे, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
सिंधिया म्हणाले, विमानांप्रमाणे, ड्रोनचा उड्डाण मार्ग देशात निश्चित केला जाणार आहे. एका सॉफ्टवेअरच्या आधारे लोकांना निर्दिष्ट क्षेत्रात ड्रोन उडवण्याची परवानगी दिली जाणार आहे. वाहनांप्रमाणे ड्रोनचीही नोंदणी केली जाणार असून ड्रोन उडवणाऱ्या लोकांना परवाने दिले जातील.
नागरी उड्डयन मंत्री पुढे म्हणाले, ‘उडान’ योजनेअंतर्गत देशात हवाई सेवांचे “लोकशाहीकरण” केले जात असून 2025 पर्यंत 1,000 नवीन विमान मार्ग आणि 100 नवीन विमानतळ उभारण्याचे लक्ष्य साध्य करण्याचे काम सुरू आहे.