TOD Marathi

मुंबई :
सध्या राज्यात राज्यसभा (Rajyasabha) आणि विधानपरिषद (Legislative Council) आणि राज्यसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यसभा निवडणुका उद्या होणार आहेत तर २० जूनला विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडत आहेत. दरम्यान यासाठी सर्वच पक्षांकडून आपापल्या उमेदवारांची घोषणा केली गेली आहे. राष्ट्रवादीने विधानपरिषदेसाठी एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांची उमेदवारी जाहीर केली आणि ते आज अर्ज दाखल करणार आहेत.

राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यामुळे एकनाथ खडसे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहे. यासंदर्भात ते माध्यमांशी बोलत होते. “विधानसभेच्या कालखंडात ज्या घटना घडल्या त्यामुळे मला भाजपातून राष्ट्रवादीमध्ये यावं लागलं असं ते बोलताना म्हणाले. मला भाजपने फक्त गाजर दाखवलं. सत्ता माझ्या दृष्टीकोनातून मोठी नाही. पण ज्या प्रकारे मला आधार राष्ट्रवादीने दिला तो माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. माझ्या पडत्या काळात माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्यांवर प्रामाणिक राहणं माझं कर्तव्य आहे.” असं एकनाथ खडसे बोलताना म्हणाले.

“शरद पवारांनी (Sharad Pawar) माझ्यावर विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली आहे. आज महाराष्ट्रातल्या भाजपमध्ये गोपीनाथ मुंडेंचं योगदान खुप मोठं आहे. मुंडे-महाजन-खडसे यांनी भाजपला महाराष्ट्रात मोठं केलं, पण भाजपने पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना तिकीट न देणं ही मोठी दुर्दैवी गोष्ट आहे, खेदजनक आहे, हे पंकजासाठी अन्याय आहे. ज्या लोकांचं पक्षासाठी योगदान नाही ते पदावर बसतात हे खूप दुर्दैवी आहे. भाजपने पंकजा यांचा विचार करायला पाहिजे होता.” असंही मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं आहे.

राज्यसभेसाठी सध्या घोडेबाजार सुरू आहे. २३ वर्षामध्ये असं कधी झालं नव्हतं. इतके वर्षे सामंजस्याने प्रश्न सुटत होते मात्र सध्या पक्ष ज्या भूमिका घेतात ते लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही असंही खडसे बोलताना म्हणाले. राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यामुळे पक्षाचे आभार मानत भाजपने पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय केल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं.