TOD Marathi

मुंबई | मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्यात खडाजंगी पाहायला मिळत आहे. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. एकनाथ खडसेंनी जमिनीत तोंड काळं केलं नसतं तर ते आमच्याच परिवारात राहिले असते. त्यांना नवीन मालक शोधावा लागला नसता, अशी टीका फडणवीसांनी केली. यावर एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

ते म्हणाले, “फडणवीसांनी काल माझ्यावर टीका केली. मला वाटतंय फडणवीस अलीकडच्या काळात थोडं नैराश्यात आहेत. लहान मुलांप्रमाणे ते बालिश टीका करायला लागले आहेत. उपमुख्यमंत्री स्तरावरचा माणूस आणि माजी मुख्यमंत्री असलेल्या माणसाने काय शब्द वापरावे, काय बोलू नये, हे समजायला हवं. अलीकडच्या काळात विचित्र स्थिती पाहायला मिळतेय. ते कधी समोरच्याला म्हणतात तुमचे सांगाडे बाहेर काढेन. तर कधी काहीही बोलतायत. अशाप्रकारे त्यांचं बोलणं आहे.”

हेही वाचा” …भारताच्या आयर्लंड दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर! ‘या’ तारखेपासून मालिकेला होणार सुरुवात”

“मला ते म्हणाले, तुम्ही जमिनीमध्ये तोंड काळं केलं. पण तो जमिनीचा व्यवहार नियामानुसार झाला आहे आणि त्या जमिनीशी माझा काहीही संबंध नाही. उलट माझा आरोप नेहमीच राहिला आहे की, मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्यामुळे त्यांनी मला अडकवण्याचा प्रयत्न केला. मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. हा माझा नेहमीचा आरोप आहे, हे संपूर्ण जगाला माहीत आहे. मी कोणताही गैरव्यवहार केला नाही, असं मी वारंवार सांगितलं आहे. मी जमीनच खरेदी केली नाही, मग जमिनीच्या व्यवहारात तोंड काळं करण्याचा संबंध कुठे येतो,” असंही खडसे म्हणाले.

“तुमच्याकडे पाहिलं तर अनेकजण तोंड काळं करण्याच्या पलीकडे काळेकुट्ट चेहरे तुमच्या शेजारी बसतात. त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे आरोप तुम्हीच केले आहेत. आज ते तुमच्या मंत्रिमंडळात आहेत. ते तुमचे सहकारी आहेत. अशा भ्रष्ट लोकांना घेऊन तुम्ही मंत्रीमंडळ तयार केलं आहे. यामध्ये अनेक आमदारही आहेत. त्यामुळे कुणी काळं तोडं केलं किंवा कुणी हिरवं तोंड केलं, असं म्हणण्यापेक्षा कापसाला भाव कधी देणार? हे सांगा. मूळ विषय बाजूला ठेवू नका. कापसाला अनुदान द्या, ही माझी पहिली मागणी आहे. असा टोलाही एकनाथ खडसेंनी फडणवीसांना लगावला.